ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडीची ‘काळी दिवाळी’!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध; सरसकट कर्जमाफीसह १२ मागण्यांचे निवेदन सादर

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे वाढते आर्थिक संकट, शेतमजुरांच्या हाताला काम नसणे आणि शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कुटुंबे आणि विविध क्षेत्रांतील कष्टकरी बांधवांसोबत चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी करण्यात आली. संकटात सापडलेल्या बळीराजाच्या दुःखात सहभागी होत शासनाचे लक्ष शेतकरी व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांकडे वेधण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून नांदेड जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त भागात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत व पीकविम्याची रक्कम तातडीने वितरित करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून द्यावा, मनरेगाची कामे तातडीने सुरू करावीत, तसेच शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांना विशेष आर्थिक मदत द्यावी, अशा १२ प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

याशिवाय दुष्काळग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीजबिल व इतर शासकीय देयकांच्या वसुलीला स्थगिती, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, शेतमाल खरेदी केंद्रे सुरू करणे आणि नुकसानग्रस्त गावांचे प्रत्यक्ष पंचनामे करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची मागणीही करण्यात आली.

शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, आज शेतकरी आर्थिक संकटात असताना त्याच्या प्रश्नांकडे शासनाकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतात पिके नाहीत, हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी व शेतमजुरांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत केवळ सण साजरे करण्यापेक्षा संकटग्रस्त जनतेच्या वेदनांशी एकरूप होणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मांडण्यात आली.

शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांना कार्यवाहीचे आदेश द्यावेत. अन्यथा शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

“ही दिवाळी रोषणाईची नाही, तर संकटात सापडलेल्या बळीराजाच्या वेदनांशी एकरूप होण्याची आहे. शेतकरी वाचला तर शेती वाचेल आणि शेती वाचली तरच देश वाचेल!” असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्यातील सर्व पदआधिकारी कार्यकर्त्ये उपस्थीत होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!