उपेक्षित आणि वंचितांसाठी पालक बनलेल्या तुमवाड बंधूंचे कार्य लक्षणीय : साहित्यिक देवीदास फुलारी यांचे प्रतिपादन

नांदेड : अभावग्रस्तांसाठी काम करणाऱ्या तुमवाड बंधूंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू शंभरावर लेखकांनी ‘तुमवाड बंधू’ या गौरवग्रंथात मांडले आहेत. मागील सहा दशकांपासून पी.एफ.सी. या संस्थेच्या माध्यमातून तुमवाड बंधू उपेक्षित आणि वंचितांसाठी पालक बनले आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक देवीदास फुलारी यांनी केले.
‘परिवर्तनाच्या दोन मशाली : जुळे बंधू दत्ता व दिगू तुमवाड’ या क्रिएटिव्ह पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या गौरवग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. काळूतांडा येथे पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाजाचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष के. ई. हरिदास होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजा मराठे, डॉ. अनंत राऊत, डॉ. ज्ञानेश्वर डिगोळे, बशीर शेख यांची विचारपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी वडजे यांनी केले. तब्बल ४०८ पानांच्या या गौरवग्रंथाच्या निर्मितीविषयी त्यांनी भूमिका मांडली. त्यानंतर जुळे बंधू दत्ता व दिगू तुमवाड यांनी आयुष्यातील संघर्ष, अनुभव आणि सहकार्याने दिलेले प्रेम, तसेच सहकार्य व जिव्हाळा यांचा संदर्भ देत सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ.अनंत राऊत यांनी गौरवग्रंथातील विविध लेखांचा परामर्श घेत ग्रंथावर समीक्षणात्मक भाष्य केले. अध्यक्षीय समारोप करताना के. ई. हरिदास यांनी तुमवाड बंधूंच्या कार्याचा आदर्श ठेवून, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने समाजपरिवर्तनासाठी नव्याने उभे राहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. ज्ञानेश्वर डिगोळे, गणपत पवार, बालाजी वडजे, दत्ता पांचाळ, दिनेश कोंचमवाड, नारायण भोसले, बालाजी राठोड, बळवंत वडजे, बस्वलिंग हत्ते, उषादेवी घैरावार, मारुती कंदाकुर्ते, डॉ.सूर्यकांत शेळके, उज्ज्वला मुंगल, भागिरथी वल्लावार, सिताराम पवार, काशीम पठाण नावंदीकर या समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी नरसिंग देशमुख, सुनील एबंडवार, डॉ.वीरभद्र हिमगिरे, आशाताई देगलूरकर, प्राचार्य खंडगावकर, भाऊराव मोरे, वा.ल. श्रीमंगले, प्रा. विठ्ठल भंडारे, इ.आर. मठवाले, व्यंकट आणेराये, प्राचार्य नखाते यांच्यासह परिसरातील शेकडो मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव बैलकवाड यांनी केले, तर दत्ता पांचाळ यांनी आभार मानले.



