ई-पिक पाहणीत चुकीच्या पद्धतीने नोंद केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
कंधार तालुक्यातील सोमठाणा येथील प्रकरण ; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई

नांदेड :- दि. २३ : कंधार तालुक्यातील सोमठाणा येथे ई-पिक पाहणी प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने पीक पाहणीची नोंद करून फोटो अपलोड केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी संबंधित ई-पिक पाहणी सहाय्यक श्री.विजय गीते यांच्याविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ई-पिक पाहणी प्रक्रियेअंतर्गत प्रत्यक्ष शेतातील पिकांची पाहणी करून त्याची छायाचित्रे व आवश्यक माहिती प्रणालीवर अपलोड करणे अपेक्षित आहे. सोमठाणा येथे संबंधित ई-पिक पाहणी सहाय्यकाने पीआयपी (फोटोवरून फोटो काढून) ई-पिक पाहणीसाठी छायाचित्रे अपलोड केल्याचे तपासणीत आढळून आले.
या प्रकाराची तपासणी करण्यात आल्यानंतर ई-पिक पाहणीची नोंद चुकीच्या पद्धतीने करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसीलदार, कंधार यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यामार्फत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली आहे.
ई-पिक पाहणी प्रक्रियेत अनियमितता अथवा चुकीच्या पद्धतीने नोंदी करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



