महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमांतर्गत महिला शेतकऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी

नांदेड :- दि. 21: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांना अधिकृत ओळख मिळावी आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे, यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्राद्वारे शेती किंवा शेतीशी संबंधित कामामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलेला अधिकृत महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्यात येते. महिलेच्या नावावर जमीन असणे हा एकमेव निकष नसून, शेती व संलग्न कृषी कार्यातील प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व देण्यात आले आहे. पीक उत्पादन व लागवड, बीज उत्पादन, फलोत्पादन, फुलशेती, भाजीपाला उत्पादन, पशुपालन व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, गांडूळखत व कंपोस्ट निर्मिती, अळंबी उत्पादन, कृषीमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन यासह विविध शेतीपूरक उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांचा यामध्ये समावेश होऊ शकतो.
महिला शेतकरी म्हणून अधिकृत नोंदणी झाल्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजना व सुविधांमध्ये महिला शेतकऱ्यांची ओळख सुलभ होण्यास मदत होणार आहे. कृषी कर्ज, पीकविमा, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण, विस्तार सेवा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरू शकते. तथापि, संबंधित योजनांच्या स्वतंत्र पात्रता व नियम लागू राहतील.
ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाच्या https://share.google/7YBWuuFb4rGtmQ4gG या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्जासाठी अप्लाय नाऊ हा पर्याय निवडून आधार क्रमांक व ओटीपीद्वारे पडताळणी करावी. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल क्रमांक, कृषी कार्याचा प्रकार आदी वैयक्तिक व कृषीविषयक माहिती भरावी. उपलब्ध असल्यास कुटुंबातील सदस्याचा फार्मर आयडी जोडून आवश्यक पडताळणी करावी. भरलेली माहिती तपासून अर्ज सबमिट करावा.
गावातील शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व पात्र महिला भगिनींनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करून घ्यावी. महिलांचा शेतीतील सहभाग अधिकृतपणे नोंदविण्यास तसेच भविष्यातील कृषीविषयक सुविधा व योजनांशी जोडले जाण्यास ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. अर्ज करताना चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ नये. अर्जासंदर्भात अडचण किंवा मार्गदर्शन आवश्यक असल्यास संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.



