मुदखेड व मुखेडचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करा!
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची मागणी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा

प्रकाश महिपाळे
नायगाव : राज्यामध्ये यंदा खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘ट्रिगर-१’ लागू न झाल्याच्या तांत्रिक कारणास्तव मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यांचा या यादीत समावेश होऊ शकला नाही. परंतु, पिकांची प्रत्यक्ष परिस्थिती व शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता या दोन तालुक्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठवले असून, त्यांच्याशी दूरध्वनीवरूनही चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात खा. अशोकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, मुदखेड तालुक्यात सरासरीच्या ८५ टक्के तर मुखेडमध्ये ८१ टक्के पावसाची नोंद असली, तरी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही आकडेवारी वाढलेली आहे. प्रत्यक्षात पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिले आहे. शिवाय, पिकांच्या वाढीसाठी सर्वात निर्णायक असलेल्या ऑगस्ट महिन्यातच पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटली आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
पिकांच्या नुकसानीची आकडेवारी मांडताना खा. चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे की, उपलब्ध माहितीनुसार मुदखेड तालुक्यात पेरणी झालेल्या २१ हजार ६७१ हेक्टरपैकी १३ हजार ८२३ हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत. तर मुखेड तालुक्यात पेरणी झालेल्या ७५ हजार ८८८ हेक्टरपैकी तब्बल ६१ हजार ६०० हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. यंदाच्या हंगामात नांदेड जिल्ह्याच्या उत्पादनात ७०.६९ टक्के संभाव्य घट अपेक्षित आहे. मुदखेड आणि मुखेडमध्येही हेच प्रमाण ६० ते ७० टक्क्यांच्या घरात आहे. याचाच अर्थ, या दोन तालुक्यांतील उत्पादनाची संभाव्य घट आणि जिल्ह्याची सरासरी घट यात फारसा फरक नाही. त्यामुळे मुदखेड आणि मुखेडची स्थिती इतर दुष्काळी तालुक्यांपेक्षा वेगळी नाही.
पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पिकांचे झालेले अतोनात नुकसान पाहता, यंदा शेतकऱ्यांच्या हाती कोणतेही उत्पन्न येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक निकषांवर न अडकता, विशेष बाब म्हणून पिकांची प्रत्यक्ष वाढ आणि झालेले नुकसान लक्षात घेऊन मुदखेड व मुखेड या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
मुखेड तालुका दुष्काळी यादीत आला नसल्याने शनिवारी सकाळापासूनच समाज माध्यमातून शासन आणि आमदार यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. अशा परिस्थितीत त्या भागाचे आमदार तत्काळ पुढ येवून शेतकऱ्यांना धिर देणे आणि शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक व होते. परंतु आ. तुषार राठोड यांच्याऐवजी मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेवून मुदखेड बरोबरच मुखेडचाही दुष्काळी यादीत समावेश करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.



