महिला वाहकांच्या बसमध्ये NCMC कार्डला नकार ; पुरुष वाहकांच्या बसमध्ये मात्र स्वीकार! बिलोली आगारातील अजब प्रकार
कार्डमध्ये पैसे असूनही रोख रकमेची मागणी… महिला प्रवाशाची बिलोली आगार प्रमुख, विभाग नियंत्रक नांदेड, प्रादेशिक महाव्यवस्थापक, संभाजीनगर तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्याकडे तक्रार

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या एनसीएमसी (NCMC) कार्ड सुविधेबाबत बिलोली आगारात विसंगत प्रकार घडत असल्याची तक्रार महिला प्रवाशांकडून करण्यात आली आहे. महिला वाहक असलेल्या बसमध्ये NCMC कार्डवरून तिकीट देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप असून, त्याच प्रवाशाला पुढील प्रवासात पुरुष वाहकाकडून NCMC कार्डवर तिकीट देण्यात आल्याने या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कुंडलवाडी येथून बिलोलीकडे जाणाऱ्या बस क्रमांक ८७२७ मध्ये हा प्रकार घडल्याचे महिला प्रवासी शांताबाई पवारे यांनी सांगितले.
“कार्ड चालत नाही, रोख पैसे द्या” — महिला प्रवाशाचा आरोप…
शांताबाई पवारे यांनी सांगितले की, बिलोलीकडे जाण्यासाठी त्या बस क्रमांक ८७२७ मध्ये प्रवास करत होत्या. तिकीट घेण्यासाठी त्यांनी महिला वाहकाकडे NCMC कार्ड दिले. त्यावेळी “कार्ड चालत नाही, रोख पैसे द्यावे लागतील,” असे उत्तर महिला वाहकाने दिल्याचे त्या म्हणाल्या.
विशेष म्हणजे, कार्ड मशीनला लावून पाहण्याची विनंती करूनही महिला वाहकाने रोख पैसे देण्याची मागणी केली, असा आरोप फवारे यांनी केला. त्यानंतर त्यांनी रोख रक्कम देऊन तिकीट घेतले.यानंतर महिला वाहकाने “हे तिकीट घे आणि कुठे सांगायचे ते सांग, माझे तिकीटावर नाव आहे,” अशा शब्दांत उत्तर दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुढच्या बसमध्ये पुरुष वाहकाकडून NCMC कार्डवर तिकीट…!
या घटनेनंतर बिलोली येथे बस बदलून शांताबाई फवारे यांनी बिलोली ते नांदेड बसने पाचपिंपळी फाटा असा प्रवास केला. यावेळी संबंधित बसमधील पुरुष वाहकाने त्याच NCMC कार्डवरून तिकीट दिले, असा दावा फवारे यांनी केला आहे.एका बसमध्ये NCMC कार्ड चालत नसल्याचे सांगितले जाते आणि त्याच कार्डवर काही वेळानंतर दुसऱ्या बसमध्ये तिकीट दिले जाते, यामुळे NCMC कार्डच्या वापराबाबत नेमकी अडचण काय होती? असा सवाल उपस्थित होत आहे.
“पुरुष वाहकाकडे कार्ड चालते, मग महिला वाहकाकडे का नाही…?”
शांताबाई पवारे यांनी या घटनेबाबत प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, NCMC कार्ड पुरुष वाहकाकडून स्वीकारले गेले, मात्र महिला वाहकाकडून कार्डवरून तिकीट देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी त्यांची मागणी आहे. NCMC कार्डमध्ये आधीच रक्कम उपलब्ध असताना प्रवाशाला पुन्हा रोख रक्कम देण्याची वेळ येत असेल, तर डिजिटल तिकीटव्यवस्थेचा उद्देश काय, असा प्रश्नही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
विभाग नियंत्रकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार…
या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी करत शांताबाई पवारे यांनी बिलोली आगारप्रमुख, विभाग नियंत्रक, नांदेड; प्रादेशिक महाव्यवस्थापक, संभाजीनगर तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्याकडे तक्रार केली आहे.त्यामुळे आता बिलोली आगारातील महिला वाहकांकडून कार्ड स्वीकार केले नसल्याचे प्रकाराची चौकशी होणार आहे.
एका कार्डला दोन नियम? एसटी प्रशासनाने खुलासा करावा…
प्रवाशांनी पैसे भरून NCMC कार्ड घेतल्यानंतर ते एसटी बसमध्ये वापरण्यास नकार दिला जात असेल, तर प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या या सुविधेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. विशेषतः एकाच प्रवाशाचे कार्ड एका बसमध्ये “चालत नाही” असे सांगितले जाते आणि पुढील बसमध्ये त्याच कार्डवर तिकीट दिले जाते, या तक्रारीची एसटी प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करणे गरजेचे आहे.बिलोली आगारातील सर्व वाहकांना NCMC कार्डच्या वापराबाबत समान सूचना देण्यात आल्या आहेत का? कार्ड मशीनमध्ये प्रत्यक्ष तांत्रिक बिघाड होता का? असल्यास तो कोणत्या कारणामुळे होता? आणि कार्डमध्ये रक्कम उपलब्ध असताना प्रवाशाला रोख पैसे देण्यास सांगण्याचे कारण काय? या प्रश्नांची उत्तरे एसटी प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
NCMC कार्डच्या वापराबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी बिलोली आगारातील प्रकाराची चौकशी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे.



