मांजरम व गोदमगाव परिसरात डोंगर पोखरणाऱ्या मुरूम माफियांना राजकीय पाठबळ आणि पोलीस यंत्रणेचाही आशिर्वाद

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यात राजकीय पाठबळ आणि पोलीस यंत्रणेचा आशिर्वाद मिळत असल्याने मुरुम माफीयांनी महसूल विभागाला टाचेखाली तुडवत मांजरम व गोदमगाव परिसरातून रात्रीला डोंगर पोखरून मुरुमाची मोठ्या प्रमाणात चोरी करण्याचा उद्योग राजरोसपणे सुरु आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी माफीयांनी डोंगरांचे सौदर्य तर नष्ट करतच आहेत पण शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचे काम करत आहेत.

नायगाव तालुक्यातील मांजरम व गोदमगाव परिसरातील डोंगर आणि टेकड्यांवर रात्रीच्या अंधारात जेसीबी, पोकलेन आणि हायवा धावू लागल्याने मुरूम उत्खननाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून, या प्रकारामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असल्याचेही सांगितले जात आहे. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या या परिसरातील डोंगर अक्षरशः पोखरले जात आहेत. पोकलेनच्या सहाय्याने डोंगराचे कडे फोडून बेकायदेशीर मुरूम काढला जात असल्याने काही ठिकाणी नैसर्गिक भूभागाची रचना बदलली आहे. मुरुमाची चोरी करुन डोंगर सपाट करण्याचा हा प्रकार सुरू राहिला तर भविष्यात पर्यावरणीय समतोलावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मांजरम व गोदमगाव शिवारातून रात्रीला मुरुमाची चोरी करुन विक्री करण्याच्या या माफीयांच्या गोरखधंद्याला आता राजकीय पाठबळ मिळत असल्याने माफीयांची दादागिरी वाढली असून. यात पोलीस यंत्रणेचाही अर्थपूर्ण आशिर्वाद मिळल्याने तर महसूल विभागाला टाचेखाली तुडवून डोंगर पोखरण्याचे काम राजरोसपणे होत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी सहा-सात हायवा वाहनांच्या माध्यमातून मुरूमाचे अवैध उत्खनन करुन वाहतूक होत असल्याचा आरोप आहे. मुरूम चोरीच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेचीही असून.
नायगाव आणि कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री पेट्रोलिंग होत असताना मुरूमाची वाहतूक करणारी वाहने निर्बाधपणे जातात कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांचे मुरूम व्यावसायिकांशी आर्थिक हितसंबंध असल्याचे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत. मासिक हप्ते, फोन-पे व्यवहार आणि व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून कथित आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचीही चर्चा असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, त्याची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर हे वाळू व मुरुम माफीयांचे कर्दनकाळ समजले जात होते. त्यांनी नायगाव तालुक्यात महसूल विभागापेक्षा जास्त कारवाया करुन माफीयांचे कंबरडे मोडण्याचे काम केलेले आहे. मात्र त्यांच्याच उपविभागात मुरुम माफीयांनी हैदोस घातलेला असताना ते शांत दिसत आहेत त्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. राजकीय पाठबळ आणि स्थानिक पोलीस यंत्रणेच्या आशिर्वादामुळे माफीयांच्या नजरेतून महसूल विभाग बेदखल झाला असल्याने शासनाला दररोज लाखो रुपयाचा चुना लावण्याचा उद्योग सुरु आहे. राजकीय पाठबळ आणि पोलीस यंत्रणेचा आशिर्वाद मिळत असल्याने नायगाव तालुक्यात मुरुम माफीया बेलगाम झाले आहेत हे विशेष.



