उमरीत पालकमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा : आमदारांच्या गैरहजेरीपेक्षा मित्रपक्षांच्या उपस्थितीची चर्चा

New Bharat Times नेटवर्क
उमरी : तालुक्यातील मौजे सोमठाणा येथे राज्याचे मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन व अन्य पिकांची पाहणी केली. पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र, पालकमंत्री आपल्या मतदारसंघात येत असताना स्थानिक भाजप आमदार अनुपस्थित राहीले पण मित्रपक्षाचे नेते उपस्थित होते. त्यामुळे आमदारांच्या अनुपस्थितीपेक्षा मित्रपक्षाचे नेते उपस्थित असल्याची जोरदार चर्चा होत आहे. या घटनेने भाजप आमदार राजेश पवार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे हा मतदारसंघ भाजपचे आमदार राजेश पवार यांचा असताना पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षित उपस्थिती दिसून आली नाही. आमदार राजेश पवार किंवा त्यांच्या कुटुंबातील पूनम पवार यांचीही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
भाजप आमदारांच्या स्वतःच्या मतदारसंघात जिल्ह्याचे पालकमंत्री येतात, शेतकऱ्यांच्या बांधावर जातात आणि सत्ताधारी पक्षाचेच स्थानिक आमदार गायब असतात आणि कार्यकर्ते अनभिज्ञ राहतात, तर नेमका संवाद कुठे तुटला? असे बोलल्या जात आहे. विशेषतः या दौऱ्यावेळी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कैलास देशमुख गोरठेकर, तालुकाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दुसरीकडे भाजपचे स्थानिक आमदार व पदाधिकारी गैरहजर राहील्याने दौऱ्याची पूर्वकल्पना नव्हती का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मित्रपक्षातील नेत्यांना पालकमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती मिळते; मात्र ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार करतात, त्याच पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना माहिती मिळत नाही, हा विरोधाभास राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही दौऱ्याची माहिती नसल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे महायुतीतील स्थानिक समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा पक्षातील ‘दुरावा’ चर्चेत..!
पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे हा प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा दौरा असला, तरी या दौऱ्यामुळे भाजपच्या स्थानिक संघटनात्मक यंत्रणेतील समन्वयाचा अभाव उघडकीस आला का? असा सवाल उपस्थित होत आहे. मतदारसंघातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद ठेवण्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्नही आता भाजपच्या स्थानिक वर्तुळात विचारला जात आहे.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्याची साधी पूर्वसूचनाही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नसेल, तर आमदारांच्या नेतृत्वाखालील स्थानिक संघटना नेमकी किती सक्रिय आहे? असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. पालकमंत्र्यांच्या दौऱ्याने शेतकऱ्यांच्या समस्या ऐरणीवर आणल्या असल्या, तरी त्याचवेळी आमदारांच्या मतदारसंघातच पक्षांतर्गत संवादाचा अभाव आणि स्थानिक नेतृत्वाची उदासीनता चर्चेत आली आहे.



