ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नायगावसह नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेशदुष्काळाच्या उपाययोजना तातडीने लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नायगावसह सर्व १४ तालुक्यांचा समावेश असल्याचे शासन निर्णयातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती व उपाययोजनांचा तातडीने लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.

दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, खरीप २०२६ हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये Trigger-9 (प्रथम कळ) लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत दुष्काळग्रस्त भागासाठी विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषात शिथिलता, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था, चारा उपलब्ध करून देणे तसेच जलसंधारणाची कामे सुरू करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे असमान वितरण, पिकांचे नुकसान आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर केल्यानंतर केवळ कागदोपत्री निर्णय न ठेवता सवलती आणि मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. विशेषतः नायगाव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा तात्काळ लाभ मिळावा, यासाठी महसूल व कृषी विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश…
दि. 25 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार नायगावसह जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, देगलूर, कंधार, लोहा, अर्धापूर, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट, भोकर, धर्माबाद, उमरी अदि 14 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!