कुंडलवाडीत भांड्याचे गोदाम फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
तांबे पितळेच्या भांड्यांसह ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त कुंडलवाडी पोलिसांची कारवाई

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- शहरातील चुंगी नाका रोडवरील भांड्याचे गोदाम फोडून तांबे-पितळेची भांडी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा कुंडलवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ४७ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल मारोती शिंदे (वय ३८, व्यवसाय भांडे दुकान, रा. हस्ताळी, ता. बिलोली) यांच्या चुंगी नाका रोडवरील गोदामात दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान चोरी झाली. चोरट्यांनी गोदामाचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तांबे व पितळेची भांडी, पाण्याच्या टाक्या, टमाटे आकाराची भांडी, पाण्याचे हंडे, प्लेटा, गंगा-जमुना घागर, टोपले आदी साहित्य लंपास केले.याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांचा माग काढत सायलू पि. नागय्या बिंगी (वय ३८), पोशेट्टी पि. गंगाराम ऊर्फ पोशेट्टी इडबिंडी (वय ४३), येनकवा भ. कृष्णा अन्ना (वय ५१) आणि गंगमणी भ. सायलू बिंगी (वय ३३) या चार आरोपींना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी तेलंगणा राज्यातील निजामाबाद परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी संगनमत करून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या मालकीचे भांडे चोरून नेल्याचे समोर आले असून, पोलिसांनी चोरीस गेलेला ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईस जिल्हा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील, धर्माबाद यांचे मार्गदर्शन लाभले.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी, पोहेकॉ संतोष सवंगार, मपोहेकॉ अरुणा श्रीवास्तव, पोहेकॉ व्यंकट घोंगडे, पोकेॉ आनंद बोडके, चालक पोहेकॉ रमेश्वर पाटील तसेच होमगार्ड हर्षवर्धन जाधव, अण्णाराव जाधव, सुनील रामपुरे व साहेबराव काळे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ संतोष सवंगार करीत आहेत.



