नायगाव बसस्थानकावर गांजाचा उघड बाजार! २० वर्षीय तरुणाला अटक, १४४ ग्रॅम गांजा जप्त

नायगाव : शहरातील बसस्थानक परिसरात पानटपरीच्या आडून गांजाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून खुलेआम गांजाची विक्री करून तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असतानाच बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत नायगाव पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई केली. या कारवाईत २० वर्षीय तरुणाला अटक करून १४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६३/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत केशव भालेराव (वय २०, रा. महात्मा फुले कॉलनी, नायगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ७ हजार २०० रुपये किमतीचा १४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
बसस्थानकासारख्या वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी पानटपरीच्या आडून अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. शिक्षणासाठी, कामासाठी आणि प्रवासासाठी येणाऱ्या तरुणांच्या आसपासच नशेचे विष विकले जात असेल, तर ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसून संपूर्ण तरुण पिढीच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे गांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. तपास अधिकारी महेश माळी पुढील तपास करीत आहेत.
मात्र, एका आरोपीला अटक करूनच पोलिसांनी थांबू नये! या गांजाचा पुरवठा नेमका कुठून होत होता? या विक्रीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे? बसस्थानक परिसरात इतके दिवस हा प्रकार सुरू असताना संबंधितांच्या निदर्शनास तो कसा आला नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. नायगावमध्ये अमली पदार्थांचा विळखा वाढण्याआधीच त्याची पाळेमुळे उखडून टाकण्याची गरज आहे. अन्यथा गांजाच्या नशेत तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.



