लोकसंवाद राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…
शिवाजी पवार, प्राचार्य कमलाकर कनसे यांना जीवनगौरव; डॉ. होपळे, बिल्लेवाड, गंगाधर भिलवंडे, कदम, लोकवाड, पुराणिक, दर्डा, राजूरकर, गायकवाड आणि बेटकर यांचाही होणार सन्मान

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, तालुका उमरी यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लोकसंवाद राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा आज लोकसंवाद साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक दिगंबर कदम यांनी केली. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार आणि लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य कमलाकर कनसे यांना जाहीर झाला आहे.
लोकसंवाद राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये साहित्य क्षेत्रासाठी प्रा. डॉ. नारायण शिवशेट्टे, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी जय जवान जय किसान विद्यालय, कोल्हे बोरगावचे कृतिशील मुख्याध्यापक विजयकुमार होपळे, गजानन वाघ आणि प्रा.राजू राजूरकर, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरेश बिल्लेवाड आणि मारोती कदम, सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल राजेश्वर रेड्डी लोकवाड, पत्रकारितेमध्ये गंगाधर भिलवंडे, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गोविंद पुराणिक, सामाजिक कार्याबद्दल पारसमल दर्डा, युवा उद्योजक क्षेत्रातील योगदानाबद्दल जयपाल गायकवाड, तर साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ. रुचिरा बेटकर यांना यावर्षीचा लोकसंवाद राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नामदार हेमंत पाटील यांच्या स्वागताध्यक्षतेखाली, सुप्रसिद्ध विचारवंत तथा लेखक, पत्रकार आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई आणि श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, तालुका उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ नोव्हेंबर रोजी आयोजित 22 वे लोकसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन गोदावरी पब्लिक इंटरनॅशनल स्कूल, शिवमळा, मरळक रोड, नांदेड येथे पार पडणार आहे. यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.



