ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

फिरतीवरील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक फेस रीडिंग हजेरीची सक्ती नको!

सक्तीच्या अंमलबजावणी विरोधात आरोग्य विभागातील विविध कर्मचारी संघटनांची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदन

नांदेड : आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या फिरतीवरील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक फेस रीडिंगद्वारे हजेरी लावण्याची सक्तीची अंमलबजावणी थांबविण्यात यावी, या मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदने सादर केली.

बायोमेट्रिक फेस रीडिंग प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अधिनियम २०२३ मधील तरतुदींच्या अनुषंगाने या प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाकडून आरोग्य विभागामार्फत दररोज विविध नवीन योजना व उपक्रम राबविण्यात येत असतात. अशा परिस्थितीत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर जाऊन काम करावे लागते. विशेषतः फिरतीवरील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक फेस रीडिंगद्वारे हजेरी लावण्याची सक्ती केल्यास शासकीय कामकाज व विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरतीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी या हजेरी प्रणालीची सक्तीची अंमलबजावणी थांबविण्यात यावी, अशी आग्रही मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. गंगाधरराव माशेनवार यांनी संघटनांची निवेदने स्वीकारली. तसेच सदर मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास बाब आणून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी उपस्थित संघटना प्रतिनिधींना दिले.

यावेळी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष दिनानाथ जोंधळे, राज्य महासचिव सुरेशदादा आरगुलवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख देविदास पेंढारकर, जिल्हाध्यक्ष संजय खुणे, राष्ट्रसेवा आरोग्य संघटनेचे राज्य प्रवक्ते अरुण गादगे, हिवताप कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्यजित टिप्रेसवार, सरचिटणीस माणिकराव गिते, उपाध्यक्ष चंद्रभान धोंडगे, नागनाथ पवार,कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव शिरसे, जिल्हा सचिव अनिल वानखेडे, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना २५७/८९ चे जिल्हाध्यक्ष गणेश कुंटूरवार, नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्षा अरुणा कुरुडे, कल्पना करपे, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना २५७/८९ चे जिल्हाध्यक्ष संदीप भंडारे, सचिव शुभम येरमवार, प्रशांत मुर्दनकर, नर्सेस संघटनेचे मानद अध्यक्ष राजू मानकर, लक्ष्मी घाटे, वनिता चढ शिंदे आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

विविध संघटनांनी एकत्रितपणे मांडलेल्या या मागणीमुळे फिरतीवरील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणींना वाचा फुटली असून, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!