ताज्या बातम्यानांदेडनायगांव

माणुसकीला काळीमा! सात महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; वैद्यकीय तपासणीत धक्कादायक प्रकार उघड ; नराधम आरोपीला अटक

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजमन सुन्न करणारी संतापजनक घटना नायगाव तालुक्यातील सातेगाव येथे उघडकीस आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर तब्बल सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आणि या अमानुष कृत्याचा पर्दाफाश झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातेगाव येथील दीपक बाबुराव जाधव (वय २६) याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत मागच्या सात महिण्यापासून लैंगिक अत्याचार केला. मुलीने पोट दुखीची तक्रार केल्यानंतर वैद्यकीय तपासणीत गर्भधारणेचा प्रकार उघड झाला. या धक्कादायक घटनेप्रकरणी पिडितीच्या वडिलांनी तातडीने कुंटूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुंटूर पोलीसांनी दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ११ नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक केली.

पांढरपेशा समाजातील नराधमाने अल्पवयीन मुलीचे बालपण हिरावून घेण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक प्रकार केला आहे. ज्या वयात मुलीने शिक्षण, स्वप्ने आणि भविष्याची स्वप्ने पाहायची, त्या वयात तिच्यावर असे संकट कोसळणे ही समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. महिलांच्या आणि बालिकांच्या सुरक्षिततेबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना अशा घटना घडणे ही गंभीर चिंतेची बाब आहे.

या प्रकरणातील आरोपीला कोणतीही दयामाया न दाखवता कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तपासात कोणतीही कसूर होता कामा नये. पुरावे वेळेत गोळा करून दोषारोपपत्र दाखल करणे आणि खटल्याचा जलदगतीने निकाल लावणे आवश्यक आहे.

दरम्यान, न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले करीत आहेत. आता या अमानुष कृत्याचा संपूर्ण तपास करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!