अल्पवयीन रुद्रची कमाल! बीडच्या बाळाघाट हिल मॅरेथॉनमध्ये २१ किमी अंतर ‘सब-टू’ करत कोरले नाव
सह्याद्रीचा घाट ते बीडची मॅरेथॉन; नांदेडच्या रुद्र रातोळीकरचा थक्क करणारा ऐतिहासिक पराक्रम

New Bharat Times नेटवर्क
नायगाव:- पायांत कसलेही व्यावसायिक बूट नाहीत, पाठीशी कसलाही मोठा प्रशिक्षक नाही आणि सरावासाठी खडतर सह्याद्रीचा अवघड घाटस्ता… अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रातोळी येथील अवघ्या ११ वर्षीय रुद्र ज्ञानेश्वर रातोळीकर याने मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बीड येथे पार पडलेल्या मराठवाड्यातील प्रतिष्ठेच्या ‘बाळाघाट हिल मॅरेथॉन’ स्पर्धेत त्याने २१ किलोमीटरचे खडतर अंतर अवघ्या १ तास ५७ मिनिटांत पूर्ण करून थक्क करणारा ‘सब-टू’ पराक्रम केला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाने संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे मान उंचावले असून, तो महाराष्ट्रातील नवोदित खेळाडूंसाठी एक नवा दीपस्तंभ ठरला आहे.
बीडमधील ही मॅरेथॉन स्पर्धा मराठवाड्यात अत्यंत मानाची समजली जाते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांसारख्या शेजारी राज्यांतील दिग्गज व अनुभवी धावपटूंनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या गर्दीत नांदेडच्या चिमुकल्या रुद्रने सहभाग नोंदवल्यामुळे तो या स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा धावपटू ठरला.
प्रचंड गर्दी, स्पर्धकांचा अनुभव आणि उपलब्ध सुविधांची वानवा या सर्व गोष्टी पाहता रुद्र या स्पर्धेत टिकेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु, रुद्रने लोकांचे हे अंदाज खोटे ठरवले. इतर स्पर्धकांकडे न बघता त्याने पूर्ण लक्ष आपल्या स्टॅमिना आणि धावण्याच्या गतीवर केंद्रित केले. प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने २१ किलोमीटरचे हे महाविघ्न अवघ्या १ तास ५७ मिनिटांत सर केले.
“मला देशासाठी सुवर्णपदक मिळवायचंय!”
आपल्या या यशानंतर बोलताना रुद्र अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाला, “परिस्थिती कितीही बिकट असली, तरी काहीच फरक पडत नाही. उराशी ध्येय बाळगून मेहनत केली, तर माणसाला कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश मिळवता येते. मी रोज न चुकता १५ किलोमीटर सराव करतो आणि यापुढेही नियमित धावणार आहे. मला माझ्या देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवायचे आहे.”
रुद्रची ही काही पहिलीच कामगिरी नाही. याआधी पुणे येथे पार पडलेल्या मानाच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतही त्याने आपल्या तुफान धावण्याच्या कौशल्याची चुणूक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते आणि नांदेड जिल्ह्याचा झेंडा उंचावला होता.
अल्पवयात आणि अत्यंत बिकट परिस्थितीत रुद्रने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल आज क्रीडा वर्तुळातून तसेच सर्वसामान्य नागरिकांमधून त्याच्यावर अभिनवनाचा वर्षाव होत आहे. छोट्याशा गावातील या ‘छोट्या चॅम्पियन’ने आपल्या कर्तृत्वाने साऱ्या महाराष्ट्राची मने जिंकली आहेत.



