अवैध दारु विक्रीमुळे नायगाव तालुक्याचे आरोग्य बिघडले : उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र हप्ते वसूली करण्यातच मग्न

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : एक व्यक्ती संपूर्ण नायगाव तालुक्यात बनावट देशी व विदेशी दारु विक्री करुन सर्वसामान्यांच्या जीवनाशी खेळत आहे. अवैध दारु विक्रीचे घुंगराळा कनेक्शन असून उत्पादन शुल्क विभागाला याची पुरेपूर माहिती आहे. असे असतानाही त्या अवैध दारू विक्री करणाऱ्या माफीयाच्या मुसक्या आवळण्याऐवजी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी फक्त दर महिण्याला हप्ते वसूली करत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागही हातभार लावत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मद्यनिर्मिती, मद्यविक्री, मद्यवाहतूक, मद्यसाठा, परवाने आणि अवैध दारूविक्री यांवर नियंत्रण ठेवण्याची प्रमुख जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. या विभागाचे मुख्य काम म्हणजे शासनाचा महसूल सुरक्षित ठेवणे, मद्यविषयक कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि अवैध उत्पादन व अवैध दारूविक्रीवर कारवाई, परवाना नसताना देशी किंवा विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे, गावागावांत सुरू असलेल्या अवैध दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकणे, हातभट्टीची दारू तयार करणारे कारखाने उद्ध्वस्त करणे, बनावट देशी-विदेशी दारूची निर्मिती, साठवणूक व विक्री रोखणे.
बनावट दारू तयार करणारे व विकणारे यांच्यावर कारवाई करणे, दारूच्या बाटल्यांवरील लेबल, होलोग्राम, बॅच क्रमांक आणि उत्पादनाची वैधता तपासणे, बनावट दारूमुळे विषबाधा किंवा जीवितहानी होण्यापासून नागरिकांचे संरक्षण करणे, संशयित मद्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे, वाहनातून होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीवर लक्ष ठेवणे.
परवाना व वाहतूक पासशिवाय मद्याची ने-आण रोखणे.
अवैध मद्यसाठा जप्त करणे, बेकायदेशीर मद्यवाहतुकीत वापरलेली वाहने कायद्यानुसार जप्त करण्याची कारवाई करणे अदि महत्वाच्या जबाबदाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या असताना या विभागाचे अधिकारी फक्त हप्ते वसूली पुरतेच नायगाव तालुक्यात फिरकतात.
उत्पादन शुल्क विभागाचे एक गुढ असून त्यांचा कारभार कुठून आणि कसा चालतो याची माहिती जनतेला होवू नये याची ते पुरेपूर काळजी घेतात. पुर्वी नायगाव तालुक्याचा कारभार बिलोलीतून चालत होता. पण बिलोलीतील कार्यालय हप्ते वसूल करण्यापुरतेच दर महिण्याच्या १ ते ५ तारखेपर्यंतच उघडे असत. याबाबत मोठ्या प्रमाणात बोभाटा झाल्याने नायगाव तालुका भोकर तालुक्याला जोडण्यात आले. कुठे माशी शिंकली की पुन्हा नायगाव तालुक्याचा कारभार देगलूर येथील कार्यालयातून सध्या सुरु आहे.
विशेष म्हणजे या कार्यालयाचे अधिकारी नांदेड येथून ये जा करतात त्यामुळे नायगाव तालुक्यात कोणत्या ठिकाणावरुन तालुकाभर अवैध दारु पोहचवल्या जाते याची पुरेपूर माहिती अधिकाऱ्यांना आहे. एक व्यक्ती अवैध दारु विक्री करुन नायगाव तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य बिघडवण्याचे काम करत असताना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी त्या दारु माफीयाचा पाहूणचार घेत असल्याची चर्चा होत आहे.
अवैध व बनावट दारुचा नायगाव तालुक्यातील खेड्यापाड्यात महापूर वाहत असतांना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी धडक मोहीम राबवून अवैध दारु विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याऐवजी दर महिण्याला हप्ते वसूल करुन दारु माफीयाला मोकाट सोडत असल्याने उत्पादन शुल्क विभागाचे काम फक्त हप्ते वसूली करण्याचेच आहे का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.



