नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी आ.श्रीजया चव्हाण यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडे

नांदेड:- बंगळुरू येथे सुरू असलेल्या ‘कॉमनवेल्थ महिला संसद सदस्य परिषदे’च्या निमित्ताने भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन नांदेड-बिदर रेल्वे मार्गाला कर्नाटक राज्य सरकारने मंजुरी द्यावी, असे साकडे घातले.
या परिषदेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळात आ. श्रीजया चव्हाण यांचा समावेश आहे. यानिमित्ताने त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. याप्रसंगी झालेल्या चर्चेत आ. चव्हाण यांनी नांदेड-बिदर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला कर्नाटक राज्य सरकारकडून आवश्यक असलेल्या परवानग्या आणि प्रकल्पातील त्यांच्या हिस्स्याच्या खर्चास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.
नांदेड-बिदर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मान्यता दिली असून, केंद्र व राज्य सरकारच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील भाजपा महायुती सरकारने या प्रकल्पास मान्यता देऊन आपल्या वाट्याचा खर्च उचलण्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित केला आहे. मात्र, अद्याप कर्नाटक राज्य सरकारने संबंधित अनुमती दिलेली नसल्याने प्रकल्प रेंगाळला आहे.
या प्रकल्पाला कर्नाटक राज्य सरकारने मंजुरी द्यावी, यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी संसदेसह कर्नाटक शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही. नांदेड व बिदर ही शीख समाजाची दोन महत्त्वपूर्ण तीर्थस्थळे या प्रकल्पाने जोडली जाणार आहेत. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे केली. त्यावर लवकरच विचार करू, असे आश्वासन शिवकुमार यांनी दिल्याचे आ. चव्हाण यांनी म्हटले आहे.



