ताज्या बातम्यानांदेडनायगांव

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईत मोठा घोळ..? कृषी सहायकावर गंभीर आरोप ; पैसे घेऊन नुकसानभरपाई वाटल्याची तक्रार!

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नायगाव तालुक्यात घडत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या वाटपात अनियमितता झाली असून, काही शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन नुकसानभरपाई मंजूर करून दिल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणात कृषी सहायक मोहन मैसनवाड यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बालाजी देशमुख यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी १८ नोव्हेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी, नायगाव यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, नुकसानभरपाईच्या वाटपात काहींना लाभ मिळाला, तर पात्र शेतकरी अद्यापही वंचित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, काही शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना किती नुकसानभरपाई मंजूर झाली, प्रत्यक्ष किती रक्कम मिळाली, कोणाच्या बँक खात्यात किती पैसे जमा झाले आणि त्यासाठी कोणाकडून पैसे घेण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केवळ कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त जमिनींची पाहणी करावी, शेतकऱ्यांचे जबाब नोंदवावेत आणि संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष चौकशी अहवाल तयार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच आरोप सिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित रक्कम परत मिळवून द्यावी आणि दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर कोणाचा डल्ला..?
नुकसानभरपाईच्या नावाखाली आर्थिक लूट होत असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आता कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करतात की प्रकरणाला कागदोपत्रीच गुंडाळतात, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!