कार्तिकी एकादशीच्या बंदीतही दारूचा महापूर! देशी दारू दुकाने आणि बिअर बार चालकांकडून मागच्या दाराने खुलेआम विक्री ; उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचेही दुर्लक्ष?

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने शासनाच्या आदेशानुसार नायगाव तालुक्यातील देशी दारूची दुकाने आणि बिअर बार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, या बंदीचा केवळ कागदोपत्री फार्स झाल्याचे चित्र समोर आले आहे. बंदच्या काळातही काही बार चालक आणि देशी दारू दुकानदारांनी मागच्या दाराने तसेच चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केल्याचा गंभीर आरोप होत आहे. त्यामुळे शासनाच्या दारूबंदी आदेशाला विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवली की संबंधित यंत्रणांनीच त्यांना मोकळे रान दिले, असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, बंदच्या दिवशी अवैध दारू विक्री रोखण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देगलूर कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. बंदीच्या काळात अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी फिरकले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दुसरीकडे नायगाव, रामतीर्थ आणि कुंटूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही दारूची चोरटी विक्री सुरू असल्याच्या तक्रारी असून संबंधित पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
नायगाव तालुका हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देगलूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतो. मात्र, या कार्यालयातील अधिकारी अवैध दारू विक्री रोखण्यासाठी किती वेळा तालुक्यात येतात आणि प्रत्यक्षात किती कारवाया करतात, हा संशोधनाचा विषय बनला आहे. अवैध दारू विक्री रोखण्यापेक्षा काही अधिकारी केवळ वसुलीसाठीच तालुक्यात येतात, असा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे. या आरोपांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करण्याची गरज आहे.
दरम्यान, नायगाव तालुक्यातील अवैध दारू विक्रीचे जाळे घुंगराळा परिसरातून चालवले जात असून बळेगाव येथील एका व्यक्तीला हाताशी धरून विविध भागांत चोरट्या पद्धतीने दारू पुरवठा आणि विक्री केली जाते. या संपूर्ण नेटवर्कची चौकशी केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर दारूबंदीचे आदेश काढायचे आणि दुसरीकडे त्याच आदेशाची पायमल्ली होत असताना संबंधित विभागांनी डोळेझाक करायची, हा कसला कारभार? बंदीच्या दिवशी दारूची विक्री करणाऱ्या दुकानदारांचे सीसीटीव्ही फुटेज, विक्रीचे व्यवहार आणि पुरवठा साखळी तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच देगलूर उत्पादन शुल्क कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस यंत्रणेची वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दारूबंदीचा आदेश फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मागच्या दाराने दारूचा बाजार सुरू असेल, तर अशा यंत्रणेचा उपयोग काय? हा प्रश्न आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.



