अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी नगरपंचायतीचीच ; MSIDC ने पाच पानी पत्रातून आरोप फेटाळले! स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा नायगाव नगरपंचायतीचा प्रयत्न उघड ; उमरी कुंटूर-नायगाव रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचा मुद्दा ऐरणीवर

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : उमरी कुंटूर-नायगावरस्ता कामात हेडगेवार चौक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी संबंधित सक्षम प्राधिकरणांची असताना, नायगाव नगरपंचायतीने ही जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळवर ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. नगरपंचायतीच्या या भूमिकेला महामंडळाने दि. २३ नोव्हेंबर रोजी तब्बल पाच पानी सविस्तर पत्र पाठवून कायदेशीर, प्रशासकीय आणि करारविषयक मुद्द्यांच्या आधारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विशेष म्हणजे, रस्त्याची मालकी आणि अतिक्रमणे हटविण्याचे वैधानिक अधिकार महामंडळाकडे नसल्याचे स्पष्ट करत, दुसऱ्याची जबाबदारी आपल्यावर ढकलणे योग्य नसल्याचे महामंडळाने ठणकावून सांगितले आहे.
नायगाव नगरपंचायतीने पत्र क्रमांक ११५४/न.पं.ना./२०२६, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी अतिक्रमणे हटविण्याबाबत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला पत्र दिले होते. मात्र, या पत्रातील भूमिका आणि १० ऑक्टोबर २०१३ च्या शासन परिपत्रकाचा करण्यात आलेला अर्थ महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने स्पष्टपणे अमान्य केला आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्ते मालमत्तेची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कायम आहे. शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार महामंडळाला केवळ प्रकल्पाच्या विकासकामांसाठी मर्यादित प्रवेशाचा अधिकार देण्यात आला आहे. या अधिकाराचा अर्थ जमिनीची मालकी किंवा अतिक्रमण हटविण्याचे वैधानिक अधिकार हस्तांतरित झाले, असा होत नाही. ५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या ना-हरकत प्रमाणपत्रातही ही बाब स्पष्ट करण्यात आली असल्याचे पत्रात नमूद आहे.
सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे रोखणे आणि हटविणे ही संबंधित जमीन मालकीच्या किंवा नियंत्रणाखाली असलेल्या विभागाची तसेच सक्षम प्राधिकरणांची जबाबदारी आहे. अतिक्रमणांची ओळख पटविणे, जमिनीची मोजणी व सीमांकन करणे, कायदेशीर नोटिसा देणे, बेदखलीची कारवाई करणे आणि आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविणे, ही कार्यवाही संबंधित महसूल प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सक्षम यंत्रणांनी कायद्यानुसार करणे आवश्यक असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच महामंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी, नांदेड यांना पत्र देऊन अतिक्रमण हटविण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. अतिक्रमणमुक्त जागा आणि रस्त्याचा आवश्यक ‘राईट ऑफ वे’ अधिकृतपणे उपलब्ध करून दिल्यानंतरच रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात येतील, असेही महामंडळाने कळविले आहे.
नगरपंचायतीने स्वतःच्या अधिकारक्षेत्रातील जबाबदारी टाळण्याऐवजी महसूल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून अतिक्रमणे हटविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका महामंडळाने मांडली आहे.
आता नगरपंचायतीची भूमिका काय?
रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून प्रस्तावित रुंदीकरणाचाही प्रश्न प्रलंबित आहे. एका बाजूला विकासकामांसाठी निधी आणि नियोजनाची चर्चा होत असताना दुसरीकडे अतिक्रमण हटविण्याच्या जबाबदारीवरून प्रशासकीय यंत्रणांमध्ये टोलवाटोलवी सुरू असल्याचे चित्र आहे. महामंडळाने पाच पानी पत्रातून आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता नायगाव नगरपंचायत अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेणार की पुन्हा जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणार, याकडे नायगावकरांचे लक्ष लागले आहे.



