पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नायगावात कार्यशाळा
सुशासन, स्वच्छता, जलसमृद्धी आणि ग्रामविकासावर भर ; अधिकारी, प्रशासक व ग्रामस्तरीय यंत्रणेला मार्गदर्शन

नायगाव : गावांचा विकास केवळ कागदावरील योजनांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कामातील गुणवत्ता, पारदर्शकता आणि लोकसहभागातून साध्य होतो. ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत नायगाव पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी (२३ नोव्हेंबर) तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली. अभियानाची उद्दिष्टे, मूल्यमापन निकष आणि प्रभावी अंमलबजावणी यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

राज्यात ११ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या अभियानातून ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, सुशासन प्रस्थापित करणे, जलसमृद्धी, स्वच्छता, लोकसहभाग आणि शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देणे अपेक्षित आहे. मात्र, अभियानाचे यश केवळ अहवाल आणि गुणांकनापुरते मर्यादित न राहता गावातील मूलभूत सुविधांमध्ये प्रत्यक्ष बदल घडवून आणण्यावर अवलंबून राहणार आहे.
अभियानाच्या सुधारित मूल्यमापन पद्धती, प्रश्नावली आणि विविध निकषांनुसार ग्रामपंचायतींनी कामकाजाची दिशा निश्चित करावी, यासाठी तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्तरावर योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय समन्वय आणि विकासकामांचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात आला.
कार्यशाळेला गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे, विस्तार अधिकारी प्रकाश जाधव, गणेश टोणगे, प्रशिक्षण कर्मचारी एकनाथ कदम, जगन्नाथ मुंडकर, तालुका व्यवस्थापक चिंतोरे, जीके व आरजीएसए ऑपरेटर शेख मुस्ताक, दीपक बच्छाव यांच्यासह पंचायत समितीचे खातेप्रमुख, प्रशासक, गाव संपर्कप्रमुख, कार्यरत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि केंद्रचालक उपस्थित होते.



