ताज्या बातम्यानांदेडनायगांव

हेडगेवार चौकातील अतिक्रमण हटवणार कोण ? १९ नोव्हेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत एम एस आय डी सी ने केली भूमिका स्पष्ट ; जागा मोकळी करण्याची जबाबदारी आता सक्षम यंत्रणेवर

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : शहरातील हेडगेवार चौकातील अतिक्रमणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, उमरी – कुंटूर–नायगाव रस्ते कामाला येथील हेडगेवार चौकातील अतिक्रमणाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या अतिक्रमणाबाबत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने आपली भूमिका स्पष्ट करत दि.१९ नोव्हेंबर रोजी नांदेडच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. आम्ही केवळ रस्ते विकासाचे काम करणारी यंत्रणा असून, अतिक्रमणे हटवण्याचे कायदेशीर अधिकार आमच्याकडे नाहीत, अशी स्पष्ट भूमिका या पत्रातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे आता हेडगेवार चौकातील अतिक्रमण हटवणार तरी कोण, हा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उमरी कुंटूर नायगाव रस्त्याचे जवळपास ७५ टक्के काम पुर्ण झाले असून काही ठिकाणी काम होणे बाकी आहे. पण रस्ता कामावरुन संबधीत कंत्राटदार कंपणी मागच्या काही दिवसापासून वादग्रस्त ठरली आहे. दुसरीकडे नायगाव येथील हेडगेवार चौकातील अतिक्रमणावरुन अनेक तक्रारी झाल्या असल्याने सुरु झालेले काम पुन्हा बंद पडले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हेडगेवार चौकातील अतिक्रमणाबाबत तक्रारी वाढल्या असून. अतिक्रमण काढूणच कामे करावी अशी जोरदार मागणी होत आहे.

पण हेडगेवार चौकातील अतिक्रमण कोण काढावे आणि कुणाची जबाबदारी आहे यावरुन मोठ्या प्रमाणात काथ्याकूट होत आहे. नायगाव नगरपंचायत म्हणते आमची जबाबदारी नाही, या बाबत महामंडळाने दि. १९ नोव्हेंबर रोजी नांदेडच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. आम्ही केवळ रस्ते विकासाचे काम करणारी यंत्रणा असून, अतिक्रमणे हटवण्याचे कायदेशीर अधिकार आमच्याकडे नाहीत, अशी स्पष्ट भूमिका या पत्रातून मांडण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, रस्त्याच्या प्रस्तावित रुंदीकरण क्षेत्रातील अतिक्रमणे शोधणे.

त्यांचे सीमांकन करणे, अनधिकृत ताबेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे आणि अतिक्रमणे हटवणे ही जबाबदारी संबंधित महसूल प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपंचायत) आणि पोलीस विभागाची आहे. आवश्यक जमीन आणि रस्त्याचा मार्ग अधिकार क्षेत्र अतिक्रमणमुक्त करून अधिकृतपणे उपलब्ध करून दिल्यानंतरच मंजूर आराखडा आणि तांत्रिक निकषांनुसार रस्त्याचे काम हाती घेता येईल, असेही पत्रात नमूद आहे.

अतिक्रमणाबाबत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या या लेटर बाँबमुळे नगरपंचायत आणि महसूल प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी एकमेकांकडे ढकलण्यातच प्रशासन धन्यता मानत आहे का? हेडगेवार चौकातील अतिक्रमणाचा प्रश्न प्रशासनाला दिसत नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जात आहे? नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघात आणि गैरसोयींचा सामना करावा लागत असताना संबंधित अधिकारी नेमकी कोणाची वाट पाहत आहेत? असा गंभीर प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

रस्त्याच्या विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येतात; मात्र अतिक्रमण हटवण्याची वेळ आली की जबाबदारीची चेंडूफेक सुरू होते. हा प्रकार म्हणजे प्रशासकीय बेफिकिरीचा कळसच म्हणावा लागेल. महामंडळाने आपली जबाबदारी आणि मर्यादा लेखी स्वरूपात स्पष्ट केल्यानंतरही सक्षम यंत्रणांनी ठोस पावले उचलली नाहीत, तर रस्ते विकासाचा प्रश्न आणखी किती काळ रखडणार? आता अपर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून महसूल विभाग, नगरपंचायत, भूमिअभिलेख विभाग आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक घ्यावी. रस्त्याच्या मंजूर हद्दीचे अधिकृत सीमांकन करून अतिक्रमणांची निश्चिती करावी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेडगेवार चौकातील अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, याचे उत्तर आता पत्रव्यवहारातून नव्हे तर प्रत्यक्ष कारवाईतून द्यावे लागणार आहे. अन्यथा विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील प्रशासकीय निष्क्रियता यातील विरोधाभास जनतेसमोर उघड होत राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!