ताज्या बातम्यानांदेडबिलोली

डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाच्या गैरहजेरित ग्रामस्थांनीच कार्यालयासमोर साजरा केला संविधान दिन!

मोरे मनोहर

किनाळा :- देशभर २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा होत असताना बिलोली तालुक्यातील डोणगाव बु. येथे ग्रामपंचायत प्रशासनाला मात्र संविधान दिनाचाच विसर पडल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिनानिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याने ग्रामसेवकाच्या गैरहजेरीतच अखेर गावातील नागरिकांनीच पुढाकार घेत ग्रामपंचायतीसमोर संविधान दिन साजरा करण्यात आला.

डोणगाव बु. तालुका बिलोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ग्रामसेवक गैरहजर असल्याने व गावाचा कारभार हा प्रशासकाकडे असल्याने गावाच्या विकासासाठी नेमण्यात आलेले प्रशासकीय अधिकारी हे देखील गैरहजरच राहत असल्याने गावातील दुष्काळजन्य परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने गावातील नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने तरी ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासकीय असलेले अधिकारी व ग्रामसेवक येऊन ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करतील अशी अपेक्षा गावातील अनेक सामान्य नागरिकांना होती मात्र या अधिकाऱ्यांना संविधान दिनाचेही काहीही देणे घेणे नसून ते संविधान दिन साजरा करण्यासाठी देखील गावात उपस्थित न राहिल्याने त्यांच्या ह्या गैरहजेरीतच गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन संविधान दिन साजरा केले यावेळी गावातील अनुप पाटील डोणगावकर, राहुल पवार, रामकिशन पेरके, भीमराव पवार, अमरदीप पवार, विठ्ठल वाघमारे, शंकर वाघमारे, गंगाराम कसलू, मिलिंद पवार यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

२१ नोव्हेंबर रोजी आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बिलोली येथे झालेल्या पाणीपुरवठा बैठकीत डोणगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत अधिकारी गावात उपस्थित राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी मांडली होती. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक बदलून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले मात्र आश्वासनानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने येथील ग्रामस्थांना शासकीय कामांसाठी वारंवार अडचणीचा सामना करावा लागत आहे.

येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेश ढवळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता माझा पदभार ग्रामसेवक कमटेवाड यांच्याकडे दिल्याचे सांगितले मात्र संबंधित ग्रामसेवक कमटेवाड यांनी मात्र मी अद्याप डोणगाव ग्रामपंचायतीचे पदभार स्वीकारले नसल्याचे सांगितले. तर प्रशासकीय अधिकारी मुदखेडकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण चौकशीच्या कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे डोणगाव ग्रामपंचायतीचा पदभार नेमका कोणाकडे? गावाच्या कारभाराची जबाबदारी कोणाची? आणि पंचायत समिती प्रशासनाचे नियंत्रण नेमके कुठे आहे? असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.

संविधान दिनानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली जाते. मात्र, डोणगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात साधा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला नाही. ज्या अधिकाऱ्यांवर गावाच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी आहे, त्यांना संविधान दिन असल्याची माहिती नव्हती का? की राष्ट्रीय दिन साजरा करण्याच्या कर्तव्याचाच विसर पडला? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात असुन डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यासाठी गैरहजर असणाऱ्या ग्रामसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने किंवा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!