मराठीच्या पाचवीच्या पाठ्यपुस्तकाच्या समीक्षणासाठी रुचिरा बेटकर यांची निवड

नांदेड : ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४’वर आधारित ‘मराठी शिकू मराठी आनंदाने’ या इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकाच्या समीक्षण सत्रासाठी सांदीपनी इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका रुचिरा बेटकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने हे समीक्षण सत्र दि. १४ व १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या पाठ्यपुस्तकाची मसुदा प्रत मंडळाच्या मराठी भाषा तज्ज्ञ समितीमार्फत तयार करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक दर्जेदार, निर्दोष आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व्हावे, या उद्देशाने शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या अनुभवी व्यक्ती आणि तज्ज्ञांकडून त्याचे समीक्षण करण्यात येणार आहे.
या सत्रात रुचिरा बेटकर यांना दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या सूचना व अभिप्रायांचा विचार करून पाठ्यपुस्तकाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत समीक्षक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाल्याने रुचिरा बेटकर यांचे अभिनंदन होत आहे.



