चांगल्या रस्त्याची तोडफोड करून निधीचा अपव्यय: नांदेड जिल्ह्यातील ‘टाकळी त.म’ येथील प्रकार ; चौकशीची मागणी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे टाकळी त.म (नविन पुनर्वसन) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नुकताच बांधलेला सुस्थितीतील पक्का रस्ता जेसीबीच्या साह्याने उखडून टाकण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शासनाच्या निधीचा अपव्यय व गैरवापर होत असल्याचा आरोप करत ‘किसान मजदूर सभा, जिल्हा नांदेड’ च्या वतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मजबूत रस्ता उखडला: २०२२-२३ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण आणि CC (सिमेंट काँक्रीट) चा पक्का रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्याची ३ ते ४ वर्षे झाली तरी स्थिती अत्यंत मजबूत आणि सुस्थितीत आहे. जेसीबीने तोडफोड: हा रस्ता अद्याप चांगल्या स्थितीत असताना आणि कंत्राटदाराची देखभाल व दुरुस्तीची मुदत बाकी असतानाही, तो रस्ता जेसीबीच्या साह्याने उखडून पुन्हा नवीन काम सुरू करण्यात येत आहे. पेव्हर ब्लॉकची तोडफोड: एवढेच नव्हे तर, अवघ्या ३ वर्षांपूर्वी बसवलेले पेव्हर ब्लॉक देखील उखडून ग्रामपंचायतीसमोर नवीन रस्ता बनवला जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष व प्रशासनावर प्रश्न…
निधीचा गैरवापर: चांगला आणि मजबूत रस्ता उखडून पुन्हा तोच रस्ता बनवण्यासाठी शासकीय निधीचा गैरवापर आणि अपव्यय का केला जात आहे, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष: टाकळी येथे प्रशासक नियुक्त असूनही ते गावात फिरकत नाहीत व ग्रामपंचायत प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश?: या प्रकारात पंचायत समिती प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासक, कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांची संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र, असे असतानाही ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसून, पुनर्वसन टाकळी गावाबाहेरून जाणար्या कॅनॉलला जोडणाऱ्या या चांगल्या रस्त्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने खोदून नवीन रस्ता टाकण्याचे अजब घाट घातले जात आहे. याशिवाय, गावातील अंतर्गत रस्त्यावर ३ वर्षांपूर्वी बसवलेले पेव्हर ब्लॉक देखील चांगल्या स्थितीत असताना ते जेसीबीने उखडून ग्रामपंचायतीसमोर टाकून नवीन काम सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
किसान मजदूर सभेचे जिल्हा सचिव कॉ. बाबूराव मानबा कुंभारगावे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, आणि गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे.
“शासकीय निधीची लूट थांबवण्यासाठी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या दोषी अधिकारी, प्रशासक व कंत्राटदाराची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी”.
महाराष्ट्रामध्ये एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नागरिक व शेतकरी संकटात सापडले असून शासनाकडून निधीच्या नियोजनाबाबत विविध आदेश दिले जात आहेत. असे असतानाही, दुसरीकडे चांगल्या स्थितीतील रस्त्यांची तोडफोड करून निधीचा उधळपट्टीच्या स्वरूपात उघडउघड अपव्यय सुरू असल्याने नागरिकांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या गंभीर आणि बेजबाबदार प्रकारावर माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, नांदेड), तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी आता काय ठोस भूमिका घेतात, दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून या गैरव्यवहाराला चाप लावतात की याकडे डोळेझाक करतात, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.



