दिल्लीला जाण्यापूर्वीच कार्यकर्त्याला पोलिसांची नोटीस ; रामतीर्थ पोलीसाकडून लोकशाहीच्या आवाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न?

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : दिल्ली येथे सिजेपीच्या होणाऱ्या आंदोलनाला जाण्याची तयारी करणाऱ्या नागसेन जिगळेकर यांना रामतीर्थ पोलिसांकडून भारतीय न्याय सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, जिगळेकर यांनी दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीटही काढल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आंदोलनाला जाण्यापूर्वीच पोलिसांनी नोटीस बजावण्यामागचा नेमका उद्देश काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

दिल्ली येथे निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेससह विविध राजकीय संघटनांच्या आंदोलन होत असून दि. १० आक्टोबर पासून सिजेपीने दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमी नागसेन जिगळेकर यांना रामतीर्थ पोलीस ठाण्यात बोलावून नोटीस देण्यात आली आहे. सदरच्या नोटीसीत महाराष्ट्र राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याचा उल्लेख करत आंदोलनात सहभागी होऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच आंदोलनादरम्यान हिंसाचार किंवा सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित आंदोलक आणि आयोजकांना जबाबदार धरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मात्र, दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याची तयारी करणाऱ्या एका कार्यकर्त्याला स्थानिक पोलिसांकडून अशा प्रकारची नोटीस बजावल्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. आंदोलनात हिंसाचार होईल, याचा ठोस आधार काय? संबंधित कार्यकर्त्याविरुद्ध नेमकी कोणती वस्तुनिष्ठ माहिती आहे? की केवळ आंदोलनात सहभागी होण्याच्या तयारीमुळेच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी स्पष्ट करणे आवश्यक आहे.
लोकशाही व्यवस्थेत कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे; मात्र कायद्याचा वापर करताना तो कोणत्याही नागरिकाच्या घटनात्मक अधिकारांवर अनावश्यक मर्यादा आणण्यासाठी होणार नाही, याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी कायदेशीर आधार असणे आवश्यक आहे. त्यामुळे या नोटिशीमागील कारणे आणि तिची आवश्यकता याबाबत पोलिसांनी पारदर्शक भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागसेन जिगळेकर यांनी दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढल्याचे रामतीर्थ पोलिसांना माहिती मिळाल्यानेच नोटीस देण्यात आली असून आता ते दिल्लीला जाणार की पोलिसांच्या नोटिशीमुळे त्यांचा प्रवास अडचणीत येणार, याकडे लक्ष लागले आहे. कायद्याच्या नावाखाली आंदोलनाचा आवाज दाबला जात असल्याचा संशय निर्माण होत आहे, यासाठी पोलिसांनी या प्रकरणात स्पष्टता देणे गरजेचे आहे. जिगळेकर यांना दि. १० आक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि अगोदर सही नसलेली नोटीस बजावण्यात आली होती पण नंतर दिलेल्या नोटीसीवर पोलीस अधिकाऱ्यांची सही करण्यात आली असल्याचे जिगळेकर यांनी सांगितले.
नागसेन जिगळेकर यांनी दिल्लीत जाण्यासाठी रिझर्वेशन काढले पण ते कन्फर्म झाले नाही तरीही या रिझर्वेशनची माहिती पोलीस यंत्रणेला कशी समजली असा प्रश्न निर्माण झाला असून. दिल्लीला जाणाऱ्या प्रवाश्यांची माहिती रेल्वे विभागानेच पोलीस यंत्रणेला दिली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



