ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मारताळा येथील वाळू तस्करांचे नायगाव तालुक्यातील जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांची धडक मोहीम ; दोन विनानंबर हायवा जप्त

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून मारताळा (ता. लोहा) परिसरातील वाळू तस्करांनी नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातल्याचा आरोप होत असतानाच, आता जिल्हा पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी वाळू तस्करीविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून, दोन दिवसांत हायवांसह अवैध वाळू उपशासाठी वापरली जाणारी यंत्रणा जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, दि. १० ऑक्टोबरच्या रात्री राबविण्यात आलेल्या मोहिमेनंतर ११ ऑक्टोबरच्या पहाटे नायगाव तालुक्यात विनानंबरच्या दोन हायवा अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आल्या. या कारवाईमुळे वाळू तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

मारताळा परिसरातील काही वाळू तस्कर राजकीय पाठबळाच्या जोरावर गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून चोरीच्या मार्गाने नायगाव तालुक्यात वाळू विक्री करत असल्याचे आरोप आहेत. या अवैध व्यवसायाला विरोध करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यापासून ते मारहाणीपर्यंतचे प्रकार घडल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न केवळ महसुली चोरीपुरता मर्यादित राहिला नसून, प्रशासनाच्या अधिकारालाच आव्हान देणारा ठरत आहे.

दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी उमरी तालुक्यातील इळेगाव येथे अवैध वाळू उपशाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या पथकावर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. शासकीय कारवाईसाठी गेलेल्या पथकावरच हल्ला होत असेल, तर अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांना नेमके कोणाचे बळ आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोदावरी नदीपात्रातून चोरी केलेली वाळू नायगाव तालुक्यात आणून विक्री केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या पथकाने रात्रीची विशेष मोहीम राबवली. ११ ऑक्टोबरच्या पहाटे नायगाव तालुक्यात नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन विनानंबर हायवा पोलिसांच्या हाती लागल्या. दोन्ही वाहने नायगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून, त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती शाम पानेगावकर यांनी दिली. वाहनांचे क्रमांक तपासादरम्यान निष्पन्न होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून नायगाव, कुंटूर आणि रामतीर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न चर्चेत आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकारांना वेळीच आळा का घातला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वाळू तस्करांशी हितसंबंध असल्याचे आरोपही केले जात आहेत; मात्र या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे. कुंटूर पोलीस ठाण्याच्या कारवाईबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

कारवाई केवळ दोन दिवसांची नको ; तस्करीचे मूळ उखडा..!
पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे अवैध वाळू वाहतुकीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, दोन-चार हायवा पकडून हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. गोदावरी नदीपात्रातील अवैध उपसा, वाळू साठवणूक, वाहतुकीचे मार्ग, विक्रीचे जाळे आणि या व्यवसायाला कथित संरक्षण देणाऱ्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

वाळू चोरी करणारे, सरकारी कारवाईला विरोध करणारे आणि अधिकाऱ्यांवर हल्ले करणारे कोणीही असोत, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेली मोहीम सातत्याने सुरू राहणार का, तसेच महसूल आणि पोलीस यंत्रणेतील कथित संगनमताच्या आरोपांची चौकशी होणार का, याकडे आता नायगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!