जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अंजली पाटील प्रथम ; संस्कृती शिरफुले द्वितीय
मराठवाडा साहित्य परिषद आणि जिल्हा परिषद नांदेडचा संयुक्त उपक्रम ; पाच विद्यार्थिनींचा गौरव

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत महात्मा बसवेश्वर विद्यालय, देगलूर येथील कुमारी अंजली गोविंदराव पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद हायस्कूल, कामारी (ता.हिमायतनगर) येथील कुमारी संस्कृती अनिल शिरफुले हिने द्वितीय, तर शिवनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावरगाव (ता.लोहा) येथील कुमारी ऋतुजा मनोहर राऊतकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, उमरी येथील कुमारी संध्या बालाजी उमरे आणि गुरुदेव विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुखेड येथील कुमारी वेदिका रमेश बादेवाड यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. लोहा येथे आयोजित तिसऱ्या जिल्हा मराठी साहित्य संमेलनात या सर्व विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी तीन हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये, तर उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त प्रत्येकी विद्यार्थिनीस एक हजार रुपये देण्यात आले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत जिल्हाभरातून चार हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
संमेलनाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. विठ्ठलराव कदम, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, मराठवाडा साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, दुसऱ्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष शंकर वाडेवाले, दिगंबर क्षीरसागर, माधव क्षीरसागर, दत्ता क्षीसागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला. मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबीतदार यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी आणि शिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार , उपाध्यक्ष दिगंबर कदम, श्रीनिवास मस्के, कार्यवाह महेश मोरे, सहकार्यवाह राम तरटे, कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी, सदस्य प्रा. डॉ. संजय जगताप, सदस्य प्रा. ललिता बोकारे-शिंदे, डॉ. योगिनी सातारकर, अनुजा डोईफोडे, धाराशिव शिराळे, शेख निजाम गवंडगावकर, अॅड. विजयकुमार भोपी, अॅड. गजानन पिंपरखेडे, व्यंकटेश काटकर आदींनी परिश्रम घेतले.



