ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

आदमपूर येथील जुगार अड्यावर धाड २३ जुगारी अटक ८ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त ; मग रोख रक्कम फक्त ४० हजारच कशी? रामतीर्थ पोलिसांच्या जुगार कारवाईवर प्रश्नचिन्ह

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदमपूर येथील बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल २३ जुगाऱ्यांना पकडण्यात आले आणि ८ लाख ७६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचा दावा रामतीर्थ पोलिसांनी केला आहे. मात्र, जप्त मुद्देमालाचा एकूण आकडा मोठा असताना प्रत्यक्ष रोख रक्कम केवळ ४१ हजार रुपये दाखविण्यात आल्याची बाब समोर आल्याने या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या जुगार कारवाईत रोख रक्कम इतकी कमी कशी, असा सवाल उपस्थित केला जात असून रामतीर्थ पोलिसांच्या या संशयास्पद कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदमपूर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सपोनि हराळे यांच्या पथकाने छापा टाकून जुगार खेळत असल्याचा आरोप असलेल्या २३ जणांना ताब्यात घेतले. फिर्यादीतील नोंदीनुसार, या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी आणि होंडा शाईन, होंडा फॅशन प्लस यांसारखी वाहने जप्त करण्यात आली. मोबाईल आणि वाहनांच्या किमतींचा समावेश केल्याने जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ८ लाख ७६ हजार ६५० रुपये नमूद करण्यात आली आहे.

मात्र, २३ आरोपी असतांना मुद्देमालाच्या एकूण किमतीच्या तुलनेत रोख रकमेचा ४१ हजाराचा आकडा अत्यल्प असल्याने संशयाला वाव निर्माण झाला आहे. जुगार सुरू असताना पकडलेल्या २३ जणांकडून नेमकी किती रोख रक्कम मिळाली? प्रत्येकाकडून जप्त केलेल्या नोटांची मोजणी आणि नोंद कशी करण्यात आली? तसेच मोबाईल व वाहनांच्या किमती निश्चित करण्यासाठी कोणता आधार घेतला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलिसांनी केलेली कारवाई चुकीचीच आहे, असा निष्कर्ष केवळ या आकडेवारीवरून काढता येणार नाही. मात्र, जप्ती पंचनामे, स्वतंत्र पंचांची साक्ष, प्रत्येकाकडून दिड ते दोन हजाराची रोख रक्कम दाखवली असल्याने संशय बळावला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांनी या कारवाईतील लोकांची प्रत्यक्ष चौकशी केल्यास संशय निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. मोठ्या मुद्देमालाच्या जप्तीचा दावा आणि प्रत्यक्ष रोख रकमेतील तफावत नेमकी कशामुळे? रामतीर्थ पोलीस ठाण्याचे ठाणेदार हराळे हे जिल्ह्यात एक वादग्रस्त अधिकारी म्हणून परिचित असल्याने आदमपूर येथील जुगार अड्यावरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जप्तीच्या संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे. कारवाई पारदर्शक असेल तर त्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. अन्यथा, आकडेवारीतील तफावतीमुळे पोलिसांच्या कारवाईबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांना अधिकच महत्त्व प्राप्त होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!