ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई ; जुलै महिन्यात कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

प्रकाश महिपाळे

नांदेड :- नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली जुलै २०२६ या महिन्यात जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राबवलेल्या या मोहिमेमध्ये नांदेड पोलिसांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासोबतच हरवलेले मोबाईल हस्तगत करणे, न्यायालयीन खटल्यांमध्ये दोषसिद्धी मिळवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष गस्त घालणे अशा विविध आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात अवैध धंद्यांविरुद्ध केलेल्या धडक कारवायांमध्ये पोलिसांनी वाळू तस्करी, गुटखा, जुगार आणि दारूबंदीवर मोठा प्रहार केला आहे. रेती वाहतूक व तस्करीप्रकरणी ४० गुन्हे दाखल करून ६५ आरोपींना अटक करण्यात आली असून १४ कोटी १९ लाख ३७ हजार ६६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध गुटखा विक्रीविरोधात २६ गुन्हे दाखल करून ३४ आरोपींकडून ६० लाख ८९ हजार २४६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय जुगार अड्ड्यांवर केलेल्या ८० कारवायांमध्ये ३२४ आरोपींवर कारवाई करत ४९ लाख १० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूबंदी कायद्यांतर्गत ३१७ गुन्हे दाखल करून ३३६ आरोपींना अटक करत २६ लाख ३१ हजार ७९० रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला.

अंमली पदार्थ विरोधी मोहीम आणि अवैध शस्त्रास्त्रांवरही पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. अंमली पदार्थप्रकरणी ३ गुन्हे दाखल करून ६ आरोपींना अटक करत २५ लाख ७१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शस्त्र अधिनियमांतर्गत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये ५ गुन्ह्यांमध्ये ६ पिस्तूल व २ मॅगझीनसह ६ आरोपींना अटक करण्यात आली, तर इतर १७ गुन्ह्यांमध्ये १४ आरोपींकडून १७ तलवारी, खंजीर व कुकरी जप्त करण्यात आल्या. याशिवाय इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मेड इन पाकिस्तान लेबल असलेली सौंदर्यप्रसाधने जप्त करून ३९ लाख ६९ हजार ९४० रुपयांचा ऐवज जप्त करत एका गुन्ह्यात २ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

इतर महत्त्वाच्या कामगिरीमध्ये पोलिसांनी ४७१ हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीआयटीए) २ गुन्हे दाखल करून १३ आरोपींवर कारवाई करत ११ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच अपहरण झालेल्या २८ मुली आणि २ मुलांपैकी १९ मुली आणि १ मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. बेपत्ता व्यक्तींच्या शोध मोहिमेत २९ महिला व २२ पुरुषांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ किलो वजनाचे भांडीचे दागिने लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून ७ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला, तर न्यायालयीन पाठपुरावा करून ४ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात आली.

कारवाई सोबतच नांदेड पोलिसांकडून मिशन कवच अंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये अंमली पदार्थ विरोधी आणि सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त सुरू आहे. तसेच ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सायबर जनजागृती आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शिस्तीचे धडे दिले जात आहेत. सुरक्षित व सजग नांदेडसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker