आधुनिक शेतीतून यशाचा मार्ग ; प्रगतशील शेतकरी संतोष डुकरे यांची सोयाबीन लागवड चर्चेत…

तानाजी शेळगावकर
नायगाव :- नायगाव तालुक्यातील धुप्पा येथील प्रगतशील शेतकरी तथा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त संतोष अशोकराव डुकरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सोयाबीन लागवडीत नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी 26 जून रोजी गट क्रमांक 47 मधील तीन एकर 20 गुंठे क्षेत्रावर अभिन्ता कंपनीच्या kds-726 सोयाबीन वाणाची बेडवर टोकन पद्धतीने लागवड केली.
या लागवडीसाठी सुमारे 30 किलो बियाण्यांचा वापर करण्यात आला असून पिकाची उगवण क्षमता शंभर टक्के उगवण झाल्याचे संतोष डुकरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे लागवडीनंतर आजपर्यंत कोणतेही रासायनिक खत वापरण्यात आलेले नाही. केवळ एक फवारणी करण्यात आली असून त्यामध्ये सिजेंटा कंपनीचे इसाबियन व अलिका कीटकनाशकाचा वापर करण्यात आला आहे. ही टोकन पद्धतीची यांत्रिक लागवड रिलायन्स फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) सगरोळी यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या यंत्राद्वारे करण्यात आली. यासाठी सहकार्य करणाऱ्या त्या संस्थांचे त्यांनी आभार मानले आहेत.
नांदेड , देगलूर राज्य महामार्गालगत असलेल्या गट क्रमांक 47 मधील ही शेती सध्या नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. अनेक नागरिक येथे थांबून पिकाची पाहणी करीत असून लागवडीची माहिती जाणून घेत आहेत. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे मत परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
यावर्षी या क्षेत्रातून एकरी सुमारे 17 क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा संतोष डुकरे यांनी व्यक्त केली. यापूर्वीही त्यांनी टरबूज लागवडीत यश मिळवून चांगले उत्पादन घेतले होते. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर शेतीत भरघोस उत्पन्न मिळविता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
“शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून खर्च कमी व उत्पादन जास्त मिळविण्याकडे लक्ष द्यावे,” असे आवाहनही संतोष डुकरे यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील अतिशय मेहनती धुप्पा येथील हा तरुण व तडफदार शेतकरी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



