कोटग्याळ ते माचनूर पुलावरून पाणी ; कुंडलवाडी ते माचनूर संपर्क तुटला

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- दोन दिवसांपासून कुंडलवाडी शहरासह संपूर्ण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोटग्याळ ते माचनूर गावादरम्यान असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कुंडलवाडी–माचनूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही गावांमधील संपर्क तात्पुरता तुटला असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
पुलावर पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक थांबविली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच अत्यावश्यक कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे.सततच्या पावसामुळे परिसरातील ओढे-नालेही दुथडी भरून वाहत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. शेतीपिकांना या पावसाचा दिलासा मिळत असला, तरी दुसरीकडे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. कोटग्याळ ते माचनूर पुलावरून पाणी जात असल्याने या मार्गाचा वापर वाहतूकदारांनी करू नये असे आवाहन कोटग्याळ चे पोलीस पाटील साहेबराव डोंगरे यांनी केले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी पुलावरून किंवा पाण्याखालून वाहणाऱ्या रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.



