इळेगावात वाळू माफियांची दादागिरी ; पोलिसांच्या पथकावर जीवघेणी दगडफेक! कारवाईसाठी गेलेल्या एसडीपीओंसह चार पोलीस कर्मचारी जखमी
महसूल विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह ; तहसीलदारांच्या कथित कारवाईचेही गूढ कायम

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : उमरी तालुक्यातील इळेगाव येथे गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर वाळू माफियांनी तुफान दगडफेक करून हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या हल्ल्यात बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्यासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती असून, रात्री उशिरा उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.
उमरी तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. मात्र महसूल प्रशासनाकडून अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाडस इतके वाढले की, थेट पोलिसांच्या पथकावरच हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे या घटनेने समोर आले आहे.
तहसीलदारांची कारवाई, तरी दहा दिवसांत पुन्हा बोटींचा धुमाकूळ?
दि. १ सप्टेंबर रोजी उमरीच्या तहसीलदार मंजूषा भगत यांनी इळेगाव येथील गोदावरी नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशावर कारवाई केल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. मात्र या कारवाईबाबतच त्यावेळी प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्याच परिसरात पुन्हा ८ ते १० बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आल्याने महसूल विभागाच्या कारवाईची परिणामकारकता संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
जर १ सप्टेंबरची कारवाई खरोखरच प्रभावी होती, तर अवघ्या दहा दिवसांत नदीपात्रात एवढ्या मोठ्या संख्येने बोटी पुन्हा कशा उतरल्या? वाळू माफियांना नेमके कोणाचे अभय आहे? महसूल यंत्रणेच्या नजरेआड एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपसा कसा सुरू राहिला? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने जनतेसमोर देणे गरजेचे आहे.
पोलिसांवर दगडफेक; ताब्यात घेतलेला संशयित पसार
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार बिलोलीचे एसडीपीओ शाम पानेगावकर हे नायगाव व रामतीर्थ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बरबडा मार्गे बोटीने इळेगावच्या गोदावरी नदीपात्रात पोहोचले. यावेळी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती आहे. कारवाई सुरू असताना वाळू उपसा करणाऱ्या कथित सिंडिकेटमधील एका व्यक्तीने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर अचानक दुसऱ्या बाजूने पोलिसांच्या पथकावर जोरदार दगडफेक सुरू झाली. हल्ल्याची तीव्रता वाढल्याने पोलिसांना स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी माघार घ्यावी लागली.
या गोंधळाचा फायदा घेत ताब्यातील व्यक्तीही पसार झाल्याची माहिती आहे. या दगडफेकीत गजानन कोत्तापल्ले, अनिल रिंदकवाले, पुंडलीक दत्तात्रय आलेवाड आणि शेख अजमत अहेमद हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींवर नायगाव येथे उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.
महसूल विभागाच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करा!
गोदावरीचे पात्र दिवसाढवळ्या ओरबाडले जात असताना प्रशासन नेमके काय करत आहे, हा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना अवैध वाळू उपसा रोखण्यात महसूल यंत्रणा अपयशी ठरत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे.
पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्याइतपत वाळू माफियांची मुजोरी वाढली असेल, तर या मागे केवळ माफियांचे बळ आहे की प्रशासनातील काही घटकांचे अप्रत्यक्ष संरक्षण, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तहसीलदार मंजूषा भगत यांच्या कार्यकाळातील इळेगाव परिसरातील सर्व वाळू कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत वाळू माफियांची मजल गेली असेल, तर हा केवळ वाळू चोरीचा विषय राहिलेला नाही; हा प्रशासनाच्या धाकाला थेट आव्हान देणारा प्रकार आहे. आता शासनाने कागदी कारवायांऐवजी ठोस आणि कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
उमरी तालुक्यातील गोदावरी नदीचे पात्र महसूल विभागाच्या खाबुगीरीमुळे वाळू माफीयांनी ओरबडण्यास सुरुवात केली असून याचा अर्थिक फटका शासनाला बसत आहे. त्यु या वाळू माठीयांना उघड उघड पाठींबा देणाऱ्या तहसीलदार मंजूषा भगत यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी होत आहे.



