ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नांदेडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाखांची मदत द्या

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात- संभाजी ब्रिगेडचा प्रशासनाला इशारा

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटाच्या छायेत आला असून नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर येथे निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मागणीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला काही भागांत समाधानकारक पाऊस झाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनमध्ये शेंगा भरण्याचा आणि कापसाला बोंड येण्याचा हा निर्णायक काळ आहे. अशा वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक असताना कडक उन्हामुळे पिके कोमेजण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

निवेदनात पावसाच्या आकडेवारीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ८२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यंदा केवळ ५२१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३०५ मिलिमीटरची तूट असल्याचा दावा करण्यात आला आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला असतानाही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे.


पाऊस वेळेवर न झाल्याने सोयाबीन, कापूस यासह इतर खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बालाजी देशमुख नरंगलकर, मधुकर पा. शिंदे, आकाश पांचाळ नायगावकर, निलकंठ पा. मोरे देगावकर, अहम्मद शेख यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!