ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा: ४ सप्टेंबरला नायगाव तालुका बंदचे सकल मराठा समाजाचे आवाहन

प्रकाश महिपाळे

नायगाव :- मराठा समाजाच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी शुक्रवारी, ४ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण नायगाव तालुका शांततेत आणि कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाज, नायगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी नायगावचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना अधिकृत निवेदन देऊन आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आली.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण नायगाव तालुक्यात बंद पाळण्यात येणार आहे. हा बंद पूर्णपणे लोकशाही मार्गाने आणि शांततेत पाळला जाणार असून कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले जाईल. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि तालुक्यात शांतता टिकून राहावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या शांततामय बंद आंदोलनाला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनाची प्रत नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!