विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणाने महिलेचा मृत्यू? १७ सप्टेंबरला आत्मदहनाचा पीडित भावाचा इशारा

प्रकाश महिपाळे
नांदेड :- विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तिच्या भावाने केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई न झाल्यास, १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री यांच्यासमक्ष आत्मदहन करण्याचा इशारा पीडित भावाने निवेदनाद्वारे दिला आहे.
बालाजी श्रावण गायकवाड (रा. रातोळी, ता. नायगाव, जि. नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण शिल्पा भिमानंद वाघमारे (वय ३० वर्ष, रा. ज्ञानेश्वर नगर, सिडको, नांदेड) हिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी १३ ऑगस्ट २०२६ रोजी विष्णुपुरी रुग्णालयातील वॉर्ड क्र. १६ मध्ये दाखल करण्यात आले होते.
१४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांनी तपासणी करून शिल्पा हिला एक इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर एका मिनिटातच तिच्या तोंडातून फेस आला व ती खाटावरून खाली कोसळली. यानंतर तिला तातडीने वॉर्ड क्र. १९ मध्ये हलवण्यात आले. नातेवाईकांनी चौकशी केली असता, “हे नेहमीचेच इंजेक्शन आहे, काळजी करू नका” असे सांगून डॉक्टरांनी टाळाटाळ केली. मात्र, सकाळी ९ वाजताच्या सुमारास डॉक्टर धुलेवाड व त्यांच्या टीमने रुग्ण दगावल्याचे घोषित केले.
डॉक्टर आणि स्टाफच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर ए. भोसले तपास करत आहेत.
संबंधित निष्काळजी डॉक्टर धुलेवाड व स्टाफवर कारवाई न झाल्यास १७ सप्टेंबर रोजी ‘माता गुजरी विसावा उद्यान’ येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर आत्मदहन करणार असल्याचे बालाजी गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अधिष्ठाता यांना पाठवण्यात आल्या आहेत.
विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी हेळसांड दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ रुग्णांकडे अजिबात लक्ष देत नसून, उपचारांसाठी नातेवाईकांना त्यांच्या पाया पडण्याची आणि विनवणी करण्याची वेळ येत आहे. शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत असून जनसामान्यांतून अत्यंत तीव्र संताप व्यक्त होत आहे. “या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी आक्रमक मागणी आता सामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.



