महसूल व पोलिसांच्या सहकार्याने मुरूम माफियांचा सुळसुळाट ; हप्तेखोरीमुळे रात्रीच्या अंधारात खुलेआम मुरूमाची चोरी

अंकुशकुमार देगांवकर
नायगाव : नायगाव तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले डोंगर आणि हिरवेगार माळरान सध्या मुरूम माफियांच्या अमानुष उत्खननामुळे संकटात सापडले आहे. निसर्गाचा समतोल ढासळत असतानाच दुसरीकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अलिखित पाठिंब्यामुळे अवैध मुरूम उपसा दिवसेंदिवस फोफावत चालल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
पोकलेनने डोंगर पोखरले ; मांजरम अन् गोदमगाव शिवारात धुमाकूळ…
कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता मांजरम आणि गोदमगाव शिवारात रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या साहाय्याने डोंगराचे सौंदर्य पोखरले जात आहे. रोज रात्री ६ ते ७ हायवा गाड्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या महसुलावर दरोडा टाकला जात आहे. नियमानुसार उत्खननासाठी परवानगी बंधनकारक असताना, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे किंवा आर्थिक हितसंबंधांमुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी महसूल विभागाचे गस्ती पथक केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने शासनाचा महसूल अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.
हप्तेखोरी आणि ‘फोन पे’वरून व्यवहार; पोलिसांवर गंभीर आरोप
रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगची जबाबदारी असणारे नायगाव व कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी खाकी वर्दीची पायमल्ली करत माफियांच्या गाड्या मोकळ्या मार्गाने पास करत असल्याचे चित्र आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पोलीस ठाण्यांतील ठरवून दिलेले कर्मचारी अवैध रेती व मुरूम उपशाची दरमहा वसुली करत आहेत. धक्कादायक म्हणजे हा हप्त्याचा व्यवहार थेट ऑनलाइन ‘फोन पे’ द्वारे केला जात असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?
स्थानिक प्रशासन पूर्णपणे हतबल किंवा माफियांसोबत हातमिळवणी करून असल्याने नायगाव तालुक्यात सध्या ‘माफियांचे राज’ सुरू असल्याचे विदारक चित्र आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी हप्तेखोर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नायगाव तालुक्यातील सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.



