ताज्या बातम्यानांदेडनायगांव

रेतीने भरलेल्या हायवाची कारला जोरदार धडक ; महिलेचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

कृष्णूरच्या अपघाताने अवैध रेती वाहतुकीचा ‘मुखवटा’ फाटला!

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : तालुक्यात अवैध रेती वाहतूक होत नसल्याचा दावा करणाऱ्या महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर कृष्णूर येथे घडलेल्या भीषण अपघाताने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. रेतीने भरलेल्या भरधाव हायवाने कारला जोरदार धडक दिल्याने कार दोन पलट्या खात रस्त्यालगतच्या शेतात फेकली गेली. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर हायवा घटनास्थळीच सोडून चालक व मालक पसार झाल्याने अवैध रेती वाहतुकीच्या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास कृष्णूर औद्योगिक वसाहतीजवळ हा अपघात झाला. देगलूरकडून नांदेडच्या दिशेने रुग्णाला घेऊन जाणाऱ्या एम एच 43 ए सी 9263 क्रमांकाच्या मारुती सुझुकी डिझायर कारला एम एच 12 आर एन 9323 क्रमांकाच्या रेतीने भरलेल्या हायवाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार दोन पलट्या खात शेतात जाऊन पडली. या अपघातात उज्वला दिलीप नगरे (४०, धनगरवाडी, ता. देगलूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिलीप विनायक मगरे (४५) आणि ऋतुजा दिलीप नगरे (१७) हे बाप लेक गंभीर जखमी झाले. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातानंतर हायवा सोडून पोबारा!
अपघातानंतर हायवातील रेती घटनास्थळीच टाकून चालक व मालक पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुंटूर पोलिसांनी दि. २ सप्टेंबर रोजी सदर हायवा ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावला आहे. चालक व मालक फरार असल्याची नोंद करण्यात आली आहे.

‘अवैध रेती वाहतूक होत नाही’ म्हणणाऱ्यांना हा पुरावा नाही का?
गेल्या अनेक महिन्यांपासून नायगाव तालुक्यात अवैध रेती वाहतूक होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र कृष्णूर येथील घटनेत रेतीने भरलेला हायवा, त्यातून झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर वाहन घटनास्थळी सोडून चालकाचा पलायन—या संपूर्ण घटनाक्रमामुळे प्रशासनाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हा केवळ अपघात नसून अवैध रेती वाहतुकीच्या संशयास्पद कारभाराची चौकशी करण्यास भाग पाडणारी गंभीर घटना असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. हायवा कुणाचा? रेती कुठून आली? परवाना कुठे?
घटनास्थळी सापडलेल्या हायवाची मालकी कोणाची आहे? त्यामध्ये वाहतूक केली जात असलेली रेती कुठून आणली होती? या वाहतुकीसाठी वैध परवाना किंवा रॉयल्टी पावती होती का? वाहनाला वाहतुकीची कायदेशीर परवानगी होती का? या सर्व प्रश्नांची महसूल विभागाने तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.

जर रेती वाहतूक बेकायदेशीर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले, तर संबंधित वाहनमालक, चालक तसेच या वाहतुकीमागील व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!