अवैध दारू वाहतुकीवर नायगाव पोलिसांचा दणका : एक लाखाच्या दारुसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव :- तालुक्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, परराज्यातील विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर नायगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक लाखाच्या अवैध दारु साठ्यासह तब्बल ६ लाख १ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध दारूच्या काळ्या धंद्यात सक्रिय असलेल्या विक्रेते व वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री नायगाव पोलीस ठाण्याच्या पथकाला नायगाव परिसरात अवैध विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वडजे हॉस्पिटलजवळ, नायगाव येथे सापळा रचण्यात आला. यावेळी एम एच १२/ एन जे २३४६ क्रमांकाच्या कारमधून संशयास्पदरीत्या दारूची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता विविध ब्रँडची विदेशी दारू आढळून आली.
त्यामध्ये मँकडाँल, क्लासिक, ब्लेंडर, मास्टर डिलाईप, मँजिक, स्काय, वँल्कन ब्लु व्हिस्की तसेच राँयल स्टँग आदी ब्रँडच्या दारूचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. एकूण ४७७ बाटल्या, अंदाजे १ लाख १ हजार ७९० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार अंदाजे ५ लाख रुपये किमतीची असल्याने कारसह एकूण ६ लाख १ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी विशाल बहादुरमल भंडारी (वय ४०, व्यवसाय हॉटेल, रा. घुंगराळा, ता. नायगाव), संजय शंकर बनवाड, (रा. घुंगराळा, ता. नायगाव) आणि गणेश कर्क गणपती गोविंदराव जाधव या. रानसुगाव हल्ली मु. नायगाव यांच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारूच्या धंद्याला पोलिसांचा इशारा…
नायगाव तालुक्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीचा व्यवसाय फोफावत असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल भगत, पोउपनि गजानन तोटेवाड, पोउपनि बालाजी अंबुलगेकर व पोलीस अंमलदार सदाशिव पाटील, माधव पवार, दिपक शेरीकर, विनोद भंडारे यांनी पार पाडली आहे.



