गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

१९८४ पासून प्रलंबित नरंगल येथील प्लॉट वाटपासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नायगाव : मौजे नरंगल, ता. नायगाव, जि. नांदेड येथे सन १९८४ पासून प्रलंबित असलेले प्लॉट वाटप तातडीने करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सन १९८४ मध्ये पुनर्वसन वस्तीवाढ गावठाण योजनेअंतर्गत गावातील नागरिकांच्या निवासासाठी गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. सदर जमिनीचे गट/सर्वे क्रमांक ४/१, ४/८, ४/९ व २० असून, संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनीचा शासनाकडून मोबदला देण्यात आला आहे. जमीन संपादित केल्यानंतर संबंधित ७/१२ उताऱ्यावर शासनाचे नाव नोंदविण्यात आलेले असतानाही, तब्बल ४२ वर्षांपासून पात्र लाभार्थ्यांना प्लॉटचे वाटप झालेले नाही.

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक पात्र नागरिक आजही आपल्या हक्काच्या निवासाच्या जागेपासून वंचित आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून शासनाच्या प्रचलित नियम व निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना १० दिवसांच्या आत प्लॉट वाटप करण्यात यावे, अशी मागणी शंकर महाजन, रवी पंडित, संजय टिके, अमृत नरंगलकर,गणपत सवयी सोनकांबळे, गौतम डुमणे, आदीच्या वतीने निवेदनात देण्यात आली आहे.

तसेच शासनाच्या नावावर असलेल्या सदर जमिनीवर कोणाचे अनधिकृत अतिक्रमण किंवा कब्जा असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. “ही मागणी एका दिवसाची नसून सन १९८४ पासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या हक्काची आहे. प्रशासनाने दिरंगाई न करता तातडीने कार्यवाही करावी,” असे शंकर महाजन यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, १० दिवसांच्या आत प्लॉट वाटपाबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंधित लाभार्थी व गावकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!