ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट ; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : शासनाच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्यांना छेद देणारे चित्र नायगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात दिसून येत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दस्तऐवज नोंदणी, खरेदी-विक्री दस्त, बक्षीसपत्र, रजिस्ट्री यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी काही मध्यस्थांच्या माध्यमातून नागरिकांकडून अधिकची रक्कम उकळली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाने निश्चित केलेले शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी तसेच इतर अधिकृत खर्चाची माहिती स्पष्टपणे मिळत नसल्याचा फायदा काही दलाल घेत असल्याचा आरोप केला जात आहे. कार्यालयीन प्रक्रियेची माहिती करून देण्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे मागितले जात असल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.

“शासकीय शुल्क किती आणि दलालांची मागणी किती?” याचा हिशेबच नागरिकांना कळेना!

जमिनीचे व्यवहार, बक्षीसपत्र किंवा इतर दस्त नोंदणी करताना अनेक नागरिकांना कार्यालयीन प्रक्रियेची पूर्ण माहिती नसते. याच अज्ञानाचा फायदा घेत काही व्यक्ती अतिरिक्त पैसे घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात दलालांचा वाढता हस्तक्षेप हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.

विशेष म्हणजे, नागरिकांना शासनमान्य शुल्काची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी कार्यालयात विविध दस्तऐवजांचे शुल्क दर फलक स्पष्टपणे लावणे आवश्यक आहे. मात्र, अशी माहिती उपलब्ध नसल्यास गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दलालांचे फावतेय का?
नोंदणी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नायगाव दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची तातडीने तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज आहे. कार्यालय परिसरात कोणत्याही प्रकारे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शासन नागरिकांना सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याचा दावा करत असताना, जर शासकीय कार्यालयांमध्येच दलालांच्या माध्यमातून अतिरिक्त पैसे आकारले जात असतील तर हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे नायगाव दुय्यम निबंधक कार्यालय दलालमुक्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker