गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

मुस्तापूर शिवारात धक्कादायक प्रकार ; सोयाबीनच्या शेतात अज्ञाताने पुरलेली दगडाची कोरीव मुर्ती सापडली

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मुस्तापूर ता. नायगाव येथील शेतकरी नागोराव गंगाधर मोरे हे शुक्रवारी सकाळी सोयाबीनवर फवारणी करण्यासाठी स्वतःच्या शेतात गेले असता शेतात मोठा खड्डा करुन काहीतरी पुरल्याचे दिसून आले. या प्रकाराने घाबरलेल्या शेतकऱ्यांने पोलिसांना ही माहिती दिली. घटनेच गांभीर्य ओळखून नायगावचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या समक्ष सदरच्या जागेत उत्खनन केले असता भली मोठी देवीची मुर्ती निघाली. मुर्ती निघाल्याने सगळ्यानीच सुटकेचा श्वास सोडला पण सदरची मुर्ती मुस्तापूर शिवारातील शेतात का पुरण्यात आली, हे कृत्य कुणी केले? यामागे काय उद्देश आहे याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

मुस्तापूर येथील नागोराव गंगाधर मोरे यांचे लोहगाव कारेगाव रोडवर शेत आहे. यांच्या शेतात सोयाबीनचे पीक असून ते शुक्रवारी सकाळी फवारणी करण्यासाठी गेले होते. शेतात चार पाच तासापूर्वी उकरलेली माती व मुरूम दिसून आला. जड वस्तू ओढत आणल्यानंतर शेतातील पिकात त्याचे निशाण निदर्शनास आले व सोयाबीनचे नुकसान झालेले दिसले. हा प्रकार पाहील्यानंतर कुणीतरी भलतेच केले असावे असा संशय आला. त्यामुळे शेतकरी नागोराव मोरे यांनी तत्काळ नायगाव पोलीसांना ही माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने संबंधित जागेत उत्खनन केले चार ते पाच फुट खड्डा खोदल्यानंतर त्यात दगडाची कोरीव भली मोठी देवीची मूर्ती आढळून आली. या मूर्तीचे वजन अंदाजे ६० ते ७० किलो असून ती इतकी जड होती की एका व्यक्तीला उचलणे शक्य नव्हते. अखेर दोन ते तीन व्यक्तींनी दोरीच्या साहाय्याने बांधून मूर्ती खड्ड्याबाहेर काढली.

पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मूर्ती ग्रामस्थांच्या स्वाधीन केली आहे. मात्र ही मूर्ती शेतात कोणी आणि कोणत्या उद्देशाने पुरली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंधश्रद्धा, जमिनीचा वाद किंवा चोरीची मूर्ती लपवण्याचा प्रयत्न अशा विविध शक्यता गावात व्यक्त केल्या जात आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी सांगितले की, “मुस्तापूर शिवारात मूर्ती पुरल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन ती बाहेर काढण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.” सध्या नायगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मूर्ती पुरण्यामागील नेमका हेतू आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker