कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घुंगराळा येथे खुलेआम मटक्याचा आकडा ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अंकुशकुमार देगांवकर
नायगाव : कायद्याचे राज्य आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे दावे करणाऱ्या कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातच अवैध मटका आकड्याचा धंदा खुलेआम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मटक्याचे आकडे घेतले जात असून, या प्रकारामुळे कुंटूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घुंगराळा गावातील मुख्य चौक, बसस्थानक परिसर तसेच काही दुकानांच्या आडोशाला मटक्याचे अड्डे सुरू असल्याची चर्चा आहे. हातात वही-पेन घेऊन बसलेले आकडेवाले दिवसभर “ओपन-क्लोज”चे आकडे लिहून घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या जुगाराच्या नादात अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडत असून, शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार आहे.
पोलिसांना माहिती नाही, हे मान्य होण्यासारखे नाही…!
“गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात मटका सुरू आहे आणि पोलिसांना याची माहिती नाही, हे शक्य नाही,” अशी प्रतिक्रिया काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी कुंटूर पोलिसांनी सुजलेगाव येथे जुगार अड्ड्यावर कारवाई केली होती. मात्र घुंगराळा येथील मटका अड्ड्यावर कारवाई करण्यास विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निवडक ठिकाणीच कारवाई आणि काही ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. घुंगराळा येथील बिट जमादाराच्या भूमिकेवरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अवैध धंदे सुरू असताना स्थानिक पातळीवर देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी काय, असा सवाल आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
तरुणाई मटक्याच्या विळख्यात…
मटक्याच्या आहारी जाऊन अनेक तरुण आपले भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. या जुगारामुळे घरातील आर्थिक परिस्थिती बिघडत असून, अनेक कुटुंबांमध्ये वाद वाढल्याचे महिलांचे म्हणणे आहे. “घरात पैसे टिकत नाहीत, कर्ज वाढत आहे,” अशी व्यथा काही महिलांनी व्यक्त केली असून, या अवैध धंद्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष…
घुंगराळा येथील मटका अड्ड्याबाबत कुंटूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच संबंधित बिट जमादार यांच्या कर्तव्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. जर अवैध धंदे सुरू असतील तर त्याला जबाबदार कोण, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीची चौकशी करणार का? तसेच घुंगराळा येथील मटका अड्ड्यावर तातडीने कारवाई होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



