गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

शेतातून बैल चोरी करणारा आरोपी अटकेत ; ५५ हजारांचा मुद्देमाल जप्तकुंडलवाडी पोलीसांची अवघ्या काही तासांत कारवाई

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- शेतातील गोठ्यात बांधलेला बैल चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर कुंडलवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत चोरीचा छडा लावला. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा बैल आणि मोबाईल असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेला अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा बैल चोरीस गेला होता. या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९८/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलाभ रोहण यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.तपासादरम्यान एक व्यक्ती चोरी केलेला बैल घेऊन खंडगाव (तेलंगणा) राज्याच्या दिशेने पायी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव गंगाधर नागोराव सोनकांबळे (वय २१), रा. बडुर, ता. बिलोली, जि. नांदेड असे सांगितले. आर्थिक फायद्यासाठी बैल चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडून चोरीस गेलेला अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा बैल आणि अंदाजे १० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलाभ रोहण यांच्या आदेशाने, उपविभागीय पोलीस अधिकारी दसरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संतोष संगेवार ,भगवान श्रीराम आणि शिवराज गंगुलवार यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker