नांदेड :- “सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठाय हो…” या लोकशाहीर डॉ. वामनदादा कर्डक यांच्या प्रसिद्ध गीताच्या सुरांनी आणि भजनाच्या तालावर नांदेडचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मंगळवारी (२५ ऑगस्ट) पुरता दणाणून गेला. लोकपारंपारिक कलावंतांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन टायगर युवा फोर्स व पारंपारिक लोककला संवर्धन मंडळाच्या वतीने हे भव्य भजन आंदोलन छेडण्यात आले होते.
राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेचे जिल्हा समिती अशासकीय सदस्य त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान कलावंतांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासने देण्यात आली.
तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सामाजिक कार्यकर्ते कैलास माने पोटेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या:
मानधनात वाढ: वृद्ध साहित्यिक व कलावंतांना सध्या मिळणारे दरमहा ५,००० रुपयांचे मानधन तुटपुंजे असून ते वाढवून किमान १०,००० रुपये करण्यात यावे.
लाभार्थी संख्येत वाढ: जिल्ह्याची लोकसंख्या व कलावंतांची संख्या लक्षात घेता दरवर्षी मानधनासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या १०० वरून १००० पर्यंत करावी.
वयोमर्यादा सुधारणा: कलावंत मानधन योजनेसाठीची वयोमर्यादा ५० वरून ४० वर्षे करण्यात यावी.
योजनेचे हस्तांतरण: १६ मार्च २०२४ च्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडे वर्ग केलेली योजना पूर्ववत जिल्हा समाजकल्याण विभागाकडे सोपवावी.
रोजगार व सोयीसुविधा: कलावंतांना सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत जनजागृतीच्या कार्यक्रमांतून रोजगार द्यावा, मोफत घरकुल व त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण द्यावे.
सांस्कृतिक भवन व पुरस्कार: नांदेड शहरात भव्य सांस्कृतिक भवन उभे करून ग्रामीण भागातील कलावंतांचा दरवर्षी शासकीय स्तरावर सन्मान करावा.
हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील १३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेत सॅण्ड बॉक्सिंग न करता कंत्राटदारास बिले दिल्याची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषी अधिकारी एम. एस. बोडके यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे.
या आंदोलनाला ‘भीम टायगर सेना’ (संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके) व विविध सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शवला. यावेळी त्रिरत्नकुमार भवरे, लक्ष्मणराव भवरे, शाहीर रमेश नारलेवाड, शाहीर बापुराव जमधाडे, भीमशाहीर माधव वाढवे, शंकर गायकवाड, ह.भ.प. बालाजी पांचाळ, देवकाबाई मुलगीर, ज्योतीताई बेदरकर यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून आलेले शेकडो लोककलावंत पारंपारिक वेशभूषा आणि वाद्यांसह सहभागी झाले होते.