गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

रातोळीत नायगाव पोलीसांची धाड : 1.24 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त ; एकास अटक

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी साठवणूक करणाऱ्यांविरोधात नायगाव पोलिसांनी धडक कारवाई करत 1 लाख 24 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रातोळी येथे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, शहर व तालुक्यातील इतर गुटखा विक्रेत्यांवरही पोलिसांची नजर असून त्यांच्याही मुसक्या आवळण्यात येणार आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे 24 ऑगस्ट 2026 रोजी नायगाव पोलिसांना रातोळी येथील निळकंठ भुजंगराव पाटील (वय 60) हा आपल्या राहत्या घरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक गजानन तोटावार यांच्या पथकाने दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत संबंधित घरावर छापा टाकला.

या छाप्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यामध्ये सागर पान मसाला 328 पाकिटे (₹45,920), SR-1 सुगंधित तंबाखू 328 पाकिटे (₹45,920), विमल पान मसाला 190 पाकिटे (₹19,950), V-1 तंबाखू 190 पाकिटे (₹8,550), मुसाफिर पान मसाला 30 पाकिटे (₹3,600) आणि M-4 रॉयल जाफराबादी जर्दा 30 पाकिटे (₹900) असा एकूण ₹1,24,840 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी निळकंठ भुजंगराव पाटील याच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 189/2026 नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 59(1)(2) व संबंधित नियम 2011 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रातोळीतील कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी नायगाव शहर आणि तालुक्यातील पानटपऱ्या, दुकानांमधून खुलेआम प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याच्या चर्चांकडे आता पोलिस लक्ष केंद्रित करणार आहेत. पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच काही विक्रेत्यांनी दुकाने बंद केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे केवळ एखाद्या ठिकाणी छापा टाकून कारवाई न करता गुटख्याच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याची गरज आहे.
गुटखा विक्रीतून मोठा नफा कमावणारे विक्रेते आणि पुरवठादार तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत ढकलत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

शाळा-महाविद्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि पानटपऱ्यांवर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

‘छोट्या विक्रेत्यां’पासून मोठ्या साठेबाजांपर्यंत कारवाईची मागणी…
रातोळीतील कारवाईत 1.24 लाखांचा साठा सापडला, यावरून तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा किती खोलवर रुजला आहे, याची कल्पना येते. त्यामुळे पोलिसांनी केवळ साठा जप्त करून थांबण्याऐवजी हा माल कुठून आला, कोण पुरवठा करतो, कोणाकडे मोठ्या प्रमाणात साठा आहे आणि विक्रीचे जाळे कोण चालवते, याचा तपास करावा, अशी मागणी होत आहे.

गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा धडाका कायम ठेवून नायगाव शहरातील संशयित पानटपऱ्या व विक्री केंद्रांवरही अचानक तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. रातोळीतील कारवाईनंतर आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल भगत, पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड तसेच पोलीस अंमलदार शिवशंकर शिंदे, शिंदे, पाटील आणि महिला अंमलदारांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker