पत्रकारावर हल्ला व जीवे मारण्याची धमकी ; कुंटूर येथे आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव :- हॉटेल राजवाडा धाब्यावरील हाणामारीची बातमी प्रसिद्ध केल्याचा तीव्र राग मनात धरून ‘दैनिक देशोन्नती’चे कुंटूर प्रतिनिधी अनिल उर्फ मालू चंदर कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जिंतू जयराम झुंजारे व संजय जयराम झुंजारे यांच्यावर ‘पत्रकार संरक्षण कायदा’ व इतर कायदेशीर कलमांन्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कांबळे हे गेल्या १६ वर्षांपासून ‘दैनिक देशोन्नती’मध्ये कुंटूर येथे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. कुंटूर येथील हॉटेल राजवाडा धाब्यावर २९ ऑगस्ट २०२६ रोजी दारू पिण्याच्या वादावरून हाणामारी झाली होती व याप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला होता. या घटनेची बातमी कांबळे यांनी २९ ऑगस्टच्या अंकात “कुंटूर येथे दारू पिण्याच्या वादावरून पुन्हा एकमेकांत मारहाण; गुन्हा दाखल” या मथळ्याखाली प्रकाशित केली होती.
याच बातमीचा राग धरून ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास कुंटूर बस स्टँडजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिंतू जयराम झुंजारे व संजय जयराम झुंजारे या दोघांनी कांबळे यांना अडवले. “तू आमच्या विरोधात बातमी का घेतलास?” असा जाब विचारत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कांबळे यांनी पत्रकार म्हणून आपले कर्तव्य बजावल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी अत्यंत गंभीर स्वरूपाची भाषा वापरत “तुला जीवे मारून टाकू, तुझी पत्रकारिता जमिनीत गाडून टाकू” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि पत्रकारितेवर दबाव आणण्याच्या हेतूने हा प्रकार घडला असून, यामुळे पत्रकार अनिल कांबळे व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे कुंटूर (ता. नायगाव, जि. नांदेड) यांच्याकडे अर्ज सादर करून संबंधित आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तात्काळ गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.



