१५ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात
मोजणी अहवाल कोर्टात पाठविण्यासाठी लाचेची मागणी; निमतानदाराचेही संभाषणातून नाव समोर

New Bharat Times नेटवर्क
मुखेड : शेतजमिनीचा मोजणी अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना मुखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विवेकानंद पांडुरंग खुडे याला नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कथित लाचखोरीचा प्रकार चव्हाट्यावर आला असून, या प्रकरणात निमतानदार सय्यद इमरान सय्यद इकबाल याचेही नाव समोर आले आहे.
याबाबत ७२ वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे मुखेड येथील गट क्रमांक ६१ मध्ये ५३ आर शेतजमीन आहे. या जमिनीची मोजणी करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार सय्यद इमरान सय्यद इकबाल आणि शिपाई विवेकानंद खुडे हे शेतात मोजणीसाठी गेले होते.
मोजणीचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी ‘साहेबांना पैसे द्यावे लागतात’, असे सांगत लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी तक्रारदार कार्यालयात चौकशीसाठी गेले असता, पैसे न दिल्यामुळे अहवाल पाठविण्यात आलेला नसल्याचे सांगत १५ हजार रुपये दिल्याशिवाय काम होणार नाही, अशी मागणी करण्यात आल्याचे तक्रारदाराने एसीबीला सांगितले.
तक्रारीची पडताळणी २ सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आली. यावेळी शिपाई खुडे याने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हे तर त्याने स्वतःच्या मोबाईलवरून तक्रारदाराचे निमतानदार सय्यद इमरान यांच्याशी बोलणे करून दिले. संभाषणात इमरान यांनीही काम करून देण्याचे आश्वासन देत १५ हजार रुपयांची लाच घेण्यास संमती दर्शविल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले.
यानंतर दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान भूमी अभिलेख कार्यालय, मुखेड येथे एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताच शिपाई विवेकानंद खुडे याला पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांनी केले. सापळा पथकात पोहेका राजेश राठोड, बालाजी मेकाले, पोका सय्यद खदीर आणि चालक पोहेका प्रकाश मामुलवार यांचा सहभाग होता.



