Uncategorized

सोयाबीन सुकू लागल्याने कुंटूर परिसरात चिंता ; नायगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

अनिल कांबळे

कुंटूर :- नायगाव तालुक्यातील कुंटूर आणि लगतच्या परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दांडी मारल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. ऐन वाढीच्या काळात उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतातील सोयाबीनचे पीक वाळू लागले असून, कापूस आणि उडदाची पिकेही करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. सततच्या खंडामुळे पिके माना टाकत असून परिसरात भीषण दुष्काळाची चाहूल लागली आहे.

यंदाच्या हंगामात कुंटूर परिसरातील हजारो हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर, मूग आणि उडदाची पेरणी केली होती. सुरुवातीला पिके जोमात आली होती; मात्र निसर्गाच्या लहरीपणाने सर्व गणिते बिघडवली आहेत. विशेषतः माळरानावरील जमिनीतील पिकांवर कडक उन्हाचा थेट परिणाम होत असून पिके डोळ्यांदेखत वाळून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी लावणी, खते आणि खुरपणीवर केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जाण्याची वेळ आली आहे.

“निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने कुंटूर परिसरातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे,” अशी उद्विग्न भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पावसाचा खंड असाच राहिल्यास पिकांचे शंभर टक्के नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने कुंटूर परिसरातील शेतपिकांचे पंचनामे करावेत आणि नायगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!