नायगाव तालुक्यात ‘उमेद’ अभियान ग्रामसखींचा ऑनलाईन कामावर बहिष्कार; १५ हजार मानधन अन् १० लाखांच्या विम्याची प्रमुख मागणी

अनिल कांबळे
कुंटूर :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवणन्नोती अभियान (उमेद – MSRLM) अंतर्गत ग्रामीण भागात महिला बचत गटांची चळवळ बळकट करणाऱ्या आणि महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या नायगाव तालुक्यातील ग्रामसखी (ICRP/कॅडर) यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत ऑनलाईन कामे पूर्णपणे बंद ठेवणार असल्याचे निवेदन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन करणे, त्यांना १० सूत्री नियमांची माहिती देणे, बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योग-व्यवसायाकडे वळवणे या सर्व प्रक्रियेत ग्रामसखींचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र, सध्या अत्यंत तुटपुंज्या मानधनावर या महिलांना काम करावे लागत आहे. गावात आणि परिसरात फिरून काम करताना आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, बैठकांसाठी तालुका स्तरावर वारंवार यावे लागते.
प्रमुख मागण्या:
ग्रामसखींना दरमहा १५,००० रुपये निश्चित मानधन लागू करावे.
काम करताना होणाऱ्या आरोग्य धोक्यांचा विचार करता १० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे.
ऑनलाईन कामांसाठी आणि बचत गटांच्या नोंदीसाठी प्रशासनाकडून अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध करून द्यावेत.
या मागण्यांसंदर्भात नायगाव तालुक्यातील ८९ गावांतील ५८ ग्रामसखींनी एकत्र येत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण वानखेडे, प्रशांत मोरे तसेच MSRLM चे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल जोंधळे आणि प्रा. इरवंत सूर्यकर यांना लेखी निवेदन सादर केले. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आणि मानधनवाढ न केल्यास ऑनलाईन काम बंद आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन देतेवेळी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना (नायगाव तालुका) अध्यक्षा रेखाताई अनिल कांबळे (कुंटूर), सचिव संगीता जाधव (नरसी), भाग्यश्री पवार (देगाव), दैवशाला वाघमारे (शेळगाव गौरी), शारदा डोईफोडे (हुससा) यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामसखी व कॅडर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



